"सदानंदा'च्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

ग्रामदैवत श्री खंडेरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवपरिणीत दाम्पत्य, तान्हुल्याना सोबत घेऊन आलेली जोडपी, नवसपूर्तीसाठी परजिल्ह्यातून आलेली कुटुंबे, कुळाचार पाळण्यासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक आदींनी कपाळी भंडारा माखून घेत दर्शन घेतले

शिरपूर - "येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, मल्हारी मार्तंड की जय' अशा भाविकांनी केलेल्या गजरात भंडाऱ्याची उधळण करीत येथील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले.

येथील अरुणावती नदीच्या काठावर असलेल्या मंदिरात आज सकाळी आमदार कांशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी जि. प. सदस्य तुषार रंधे, राजू टेलर आदींच्या हस्ते खंडेरायाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर श्री खंडेराव बाबा विकास संस्थेतर्फे उपस्थितांसह सेवेकरी, मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

दर्शनासाठी रांगा
यात्रोत्सवाचा पहिला दिवस असल्याने आज सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामदैवत श्री खंडेरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवपरिणीत दाम्पत्य, तान्हुल्याना सोबत घेऊन आलेली जोडपी, नवसपूर्तीसाठी परजिल्ह्यातून आलेली कुटुंबे, कुळाचार पाळण्यासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक आदींनी कपाळी भंडारा माखून घेत दर्शन घेतले. दर्शनार्थीच्या रांगांमधून घुमणाऱ्या सदानंदाच्या जयघोषामुळे वातावरण प्रफुल्लित झाले होते.

लाखोंची उलाढाल
यात्रेच्या पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पूजेचे साहित्य, संसारोपयोगी जिन्नस, शेतीची लहानसहान अवजारे, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, मसाले यांच्या विक्रीसह विविध मनोरंजनात्मक खेळ, पाळणे यांचा आनंद यात्रेकरूनी लुटला. या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. अद्यापही काही लोकप्रिय कलाप्रकार, साहसी खेळ व आकाश पाळणे येऊन दाखल होत आहेत. त्यामुळे दोन दिवसांनंतर यात्रा खऱ्या अर्थाने फुलणार असल्याचे दुकानदारांमधून सांगण्यात आले.

यात्रेत "लाडकी' तेजीत
यात्रेची लज्जत म्हणून "लाडकी' या नावाने ओळखली जाणारी गुळाची जिलेबी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. लाकडे जाळून पेटवलेल्या भट्टीवर निघणारी गुळाची जिलेबी वर्षातून एकदाच शिरपूरकरांना मिळते. यात्रेतून घरी जाताना प्रसादासोबतच ही जिलेबी आणि गोडशेव घेणे हा अलिखित नियम आहे. यंदा भाव काहीसे कडाडले असले तरी लाडकीची मागणी कायम असल्याने हॉटेलचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

Web Title: festival in shirpur