महिलेच्या खुनाचा उलगडा काही तासांतच

महिलेच्या खुनाचा उलगडा काही तासांतच

धुळे - शहरातील जुन्या आग्रा रोडवरील प्रभाकर चित्रपटगृह परिसरात राजस्थान लॉजमध्ये महिलेचा खून केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा उलगडा केला, मृत महिलेची ओळख पटली असून, प्रेमसंबंधातून तिचा खून केला. मारेकऱ्यालाही आज पहाटे ताब्यात घेत अटक केली.

येथील आग्रा रोडवरील प्रभाकर चित्रपटगृहासमोर राजस्थान स्वीट व लॉजिंग ॲण्ड बोर्डिंग आहे. 

लॉजमध्ये काल सायंकाळी एक जोडपे आले. त्यातील तरुणाने स्वत:चे नाव सुरेश निळे असून, दोघे पती-पत्नी असल्याची नोंद लॉजच्या रजिस्टरमध्ये केली. त्यांनी लॉजमधील पहिल्या मजल्यावरील रूम क्रमांक १०१ बुक केली. काही वेळाने तो तरुण खाली आला, पाण्याची बाटली घेऊन पुन्हा रूमवर गेला. रात्री साडेनऊच्या सुमारास लॉजमालक तळमजल्यावर चायनीज काऊंटरवर होते. तो तरुण पुन्हा खाली आला, ‘मेडिकलमधून येतो’, असे सांगून निघून गेला तो परतला नाही. बराच वेळाने त्याची चौकशी सुरू झाली. लॉजमालकासह कर्मचाऱ्यांना संबंधित रूमचा दरवाजा उघडा दिसला. आत डोकावून पाहिले असता त्या तरुणासोबत आलेली महिला कॉटवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या मान, गळा, छातीवर जखमा होत्या, याबाबत हॉटेलमधील अभिषेक गिंदोडिया (रा. सुदर्शन कॉलनी, चितोड रोड, धुळे) यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सचिन हिरे व सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. ए. पाटील, ठाकरे यांच्यासह पोलिसांनी काल रात्री धाव घेतली.

नावावरून लागला सुगावा 
लॉजमध्ये आलेल्या व्यक्‍तीने सुरेश निळे नाव सांगून रिक्षाचालक असल्याची ओळख दिली होती. त्या ओळखपत्रावरून सुरेश निळे हा वरखेडे (ता. धुळे) येथील असल्याचे पोलिस तपासात आढळले. पोलिसांनी सुरेश निळे याचा शोध घेत वरखेडे येथून ताब्यात घेतले. त्याची  चौकशी केली असता काल सांयकाळी सातच्या सुमारास पारोळा रोड चौफुली येथे त्याच्या रिक्षात एक जोडपे बसले. त्यांनी पती-पत्नी असून लग्नानिमित्त धुळ्यात आल्याचे सांगितले होते. धुळ्यात लॉजमध्ये राहण्यासाठी ओळखपत्र नसल्याचे त्या तरुणाने सांगितले. शहरात तीन ते चार ठिकाणी लॉजमध्ये गेले होते. तेथे रूम न मिळाल्याने रिक्षाचालकाच्या ओळखपत्राची झेरॉक्‍स दाखवून लॉजमध्ये रूम मिळविल्याचे सांगितले.

प्रेमसंबंधातून खून
पोलिसांनी मृत महिलेजवळ पडलेला मोबाईल ताब्यात घेतला. त्यावरील क्रमांकावरून माहिती मिळवीत तपास केल्यानंतर मृत महिलेचे नाव योगिता मोहन शिरसाट (रा. पिंप्राळा, जि. जळगाव) निष्पन्न झाले. त्यानंतर तिच्या सोबत आलेल्या मारेकरी तरुणाचा शोध घेतला. नितीन विश्‍वनाथ पाटील (रा. पाळधी खुर्द, ता. धरणगाव, ) असे त्याचे नाव आहे. काल मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेत आज पहाटे शहरात आणले. कसून चौकशी केली असता त्याचे योगीताशी प्रेमसंबंध होते, त्यातून  त्याने तीक्ष्ण हत्याराने गळा कापून खून केल्याची कबुली  दिली. सहाय्यक उपनिरीक्षक बैरागी, हवालदार प्रल्हाद वाघ, कबीर शेख आदींनी कारवाई केली.

‘ब्लॅकमेल’ करीत असल्याने खून
संशयित नितीन पाटील याला आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नितीन पाटीलचे योगितासोबत चार ते पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. काही दिवसांपासून ती नितीनला ब्लॅकमेलही करीत होती. तसेच तिच्या अन्य काही जणांसोबत संबंध असल्याची कुणकूण नितीनला लागली होती, त्यामुळे रागाच्या भरात त्याने चाकूने गळ्यावर वार करून योगिताचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली. निरीक्षक गणेश चौधरी तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com