प्रभाग हद्दीच्या वादातून अधिकाऱ्यांमध्येच जुंपली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

सिडकोमध्ये मुबलक पाणी असते. इकडच्या टाक्‍या भरत असताना इतर भागातील व्हॉल्व्ह बंद आहेत की नाही याची खात्री केली पाहिजे. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संताप होत आहे. 
- योगेश दिवे, स्थानिक 

इंदिरानगर छ इंदिरानगरच्या प्रभाग 30 मधील नियोजनाअभावी उभ्या ठाकलेल्या पाणीप्रश्‍नावर चर्चेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी नगरसेवक आणि नागरिकांसमोरच सिडको आणि पूर्व विभाग असा हद्दीचा मुद्दा उपस्थित करून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न सुरू केल्याने नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अशा अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा करायच्या, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविल्या. 

आठ दिवसांपासून इंदिरानगर परिसरासह पांडवलेणी, वनवैभव कॉलनी या भागात पाणीप्रश्‍नाने उग्र रूप धारण केले आहे. आज सकाळी नगरसेवक सतीश सोनवणे, ऍड. श्‍याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे यांनी कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, सिडकोचे उपअभियंता संजय बच्छाव, पूर्वचे उपअभियंता रवींद्र धारणकर, कनिष्ठ अभियंता एस. आर. खाडे, श्री. सूर्यकर, श्री. निकम आदींना पांडवनगरी येथे बोलावले.

अधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा केली असता, 'मी फक्त वितरण करतो, टाक्‍या भरून देण्याची जबाबदारी पूर्व विभागाची आहे,' असे बच्छाव यांनी सांगितले, तर टाक्‍या भरताना बायपासने व्हॉल्व्ह सुरू करून सिडकोमध्ये पाणी पळविले जाते. त्यामुळे ही जबाबदारी सिडकोची आहे, असे सांगत पूर्वच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले. त्यात धर्माधिकारी यांनी टाक्‍या भरणे ही तांत्रिक बाब आहे, असे सांगितले. 

नगरसेवक आणि नागरिकांची नापसंती बघितल्यानंतर अधिकाऱ्यांनी टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरून नियोजनपूर्वक वितरण आणि पूर्ण वेळ टॅंकरची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिल्याने स्थिती काहीशी निवळली. या वेळी माजी नगरसेवक सुनील खोडे, सचिन कुलकर्णी, सुनीता वाघ, उमा जाधव, छाया पाईकराव, वसंत गवते, राहुल खर्चे, मैनाबाई पगारे, सविता गाडेकर, योगेश दिवे, करुणा गांगुर्डे, शालिनी दिवे, नीलम गांगुर्डे, मीरा गुंठे आदी उपस्थित होते. 

गेल्याच महिन्यात बैठक 
गेल्याच महिन्यात महापौरांच्या दालनात प्रभाग 23 आणि 30 च्या पाणीटंचाईबद्दल बैठक बोलविली होती. बैठक होऊन आठ दिवसही उलटले नाहीत, की पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

अधिकाऱ्यांचा आपसात सुसंवाद नाही. एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलण्याचा प्रकार संतापजनक आहे. महापौरांसोबत झालेल्या बैठकीनंतर आठ दिवसांत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण व्हावी? महासभेत ही स्थिती मांडणार असून, वेळेप्रसंगी नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून प्रशासनास धारेवर धरणार आहोत. 
-सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ऍड. श्‍याम बडोदे, सुप्रिया खोडे, नगरसेवक 

पाणी मिळत नाही हे बाजूलाच राहिले. अधिकारीच आपसात भांडत होते. नगरसेवक तरी काय करतील? यांच्या भांडणात पाणी व्यवस्थित मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. 
-सुनीता वाघ, स्थानिक 

पाणीपट्टी भरायला उशीर झाला की लगेच नोटीस येते. पण आठ दिवस झाले दोन हंडे पाणी मिळाले नाही. पाणी कसे वाटतात याचे ज्ञान नाही, मात्र ते किमान पुरेसे मिळावे ही माफक अपेक्षा आहे. 
-मैनाबाई पगारे, स्थानिक 

Web Title: Fight between corporators in Nashik Municipal Corporation over expansion of city limits