लाँग मार्चमध्ये पाय रक्तबंबाळ झालेल्या शकुबाईच्या लढ्याला यश (व्हिडीओ)

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 14 जून 2019

  • 6 मार्च 2018 ला काढण्यात आलेल्या लाँग मार्चमध्ये सहभागी झालेली शकुबाईंनी वेधले होते माध्यमांचे लक्ष
  • तापलेल्या डांबरी रस्त्याचे चटके सहन करीत अनवाणी चालत जावून गाठले होते आझाद मैदान
  • वर्षभरानंतर वन जमिन झाली नावावर

वणी (नाशिक) : मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने वर्षाभरापूर्वी नाशिक ते मुंबई लाँग मार्चात पाय रक्तबंबाळ होऊनही आझाद मैदान गाठणाऱ्या शकुबाईच्या लढयास अखेर यश आले आहे. वर्षानूवर्षे कसत असलेली वनजमीन वर्षभरानंतर स्वत:च्या नावावर झाली अन् शकूबाईच्या डोळ्यात आनंदाश्रूंना मोकळी वाट करुन देत, आपल्या काळ्या आईला दंडवत घालीत नतमस्तक झाली.

माकपाने आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृृत्वाखाली 6 मार्च 2018 ला काढण्यात आलेल्या लाँग मार्च मध्ये सहभागी झालेली वरखेडा, ता. दिंडोरी येथील 68 वर्षीय शकुबाई पंढरीनाथ वाघले ही वृध्द महिला सहभागी झालेली होती. नाशिक ते मुंबई असा सात दिवस 200 किमीची पायपीट करणाऱ्या वृध्द महिलेचे चालून चालून पायातील चपला तुटून गेल्या आणि तापलेल्या डांबरी रस्त्याचे चटके सहन करीत अनवाणी चालत जावून आझाद मैदान गाठले. यावेळी शकुबाईंच्या तळपायाची संपूर्ण कातडी सोलून जावून पाय रक्तबंबाळ झाले होते. अशा स्थितीतही मोर्चातून माघारी न परतता जोपर्यंत शासन मागण्या पूर्ण करीत नाही तोपर्यंत मी मेली तरी चालेल मी घरी परत जाणार नसल्याची ठाम भूमिका घेणाऱ्या शकुबाईने देशभरातील प्रसारमाध्यमांबरोबरच सोशल मिडीयाचे लक्ष वेधून घेतले होते. अशा शकुबाईची एप्रिल महिन्यात लोकसभेच्या प्रचाराची धामधूम सुरु असतांना 'सकाळ' प्रतिनिधींनी भेट घेत परिस्थिती जाणून घेतली होती.  

यावेळी लाँग मार्चला वर्ष उलटून गेले तरी शकुबाईचे पायाची जखमा पूर्ण बऱ्या झालेल्या नव्हत्या. पायाचा इलाज करण्यासाठी शकुबाईने नाकातील नथ गहाण ठेवून उपचार केला व ज्यासाठी पायपीठ केली ती वरखेडा शिवारात असलेली 1 एकर वनजमिनीही नावावर झाली नसल्याची खंत व्यक्त केली होती. याबाबतची बातमी दैनिक 'सकाळ'मध्ये प्रसिध्द झाली होती.

यानंतर तहसिल व प्रांत कार्यालयाने शकुबाईंच्या वन जमिनीच्या दाव्याबाबतची फाईल शोधाशोध सुरु झाली. मात्र फाईल मिळाली नाही. याबाबत प्रांत अधिकारी यांच्या सुचनेनूसार तलाठी मदन करवंदे यांनी शकुबाई व त्यांचे मेव्हणे बाळासाहेब जाधव व भाऊ साहेबराव वाघले यांना प्रांत कार्यालयात घेवून गेले. मात्र त्यांची वनजमिनीच्या प्रस्तावाची फाईल सापडत नव्हती. यावेळी शेकूबाईंचे रेशनकार्ड बघीतले असता रेशनकार्डवर शकुबाई एैवजी छबुबाई असे नाव होते. छबुबाई पंढरीनाथ वाघले नावाने फाईलची शोधाशोध सुरु केली असता त्यांचे यादीत नाव मिळून येवून त्यांचा वनजमिनीचा प्रस्ताव जिल्हास्तरीय नोव्हेंबर 2018 मध्येच जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे दावा मंजुरीसाठी पाठवल्याचे आढळून आले. त्यानंतर दाव्याच्या मंजुरीबाबत प्रांत कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबतची माहिती देत व त्यावर कार्यवाही करण्यात आली आणि शकुबाई उर्फ छबुबाई कसत असलेल्या वनजमिनीवर स्वत:चे नाव लागले व त्यांचे नावाचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर तलाठी मदन करवंदे यांनी 7 जूनला शकुबाई उर्फ छबुबाईच्या या माऊलीच्या हातात दिले. शकूबाईच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मिळालेले प्रमाणपत्र आपल्या मस्तकाला लावत आनंदाश्रूंनी डोळे पाणावले जाऊन आपल्या मुंबई वारीचे सार्थक झाल्याचा आनंद या माऊलीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागला.

दरम्यान मागच्या वर्षी शेतात भूईमुग व सोयाबीन पेरली होती, पण पावसाअभावी पिके करपली गेेल्याने सर्व मेहनत तर गेलीच पण बियाणे खताचा खर्चही मिळाला नाही. आता परत भाऊ व शेजारीच राहणाऱ्या बहीणीच्या मदतीने शेतात भूईमूग व सोयाबीन पेरायचा असल्याचे शकूबाईचे नियोजन आहे.

शकूबाईने पाय व हाताच्या उपचारासाठी कर्ज काढण्यासाठी नथ गहाण ठेवलेली आहे. पण ती अजूनही सोडवता आलेली नसून निराधार पेन्शनचे सहाशे रुपयात काय करणार असा प्रतीप्रश्न केला आहे. आजारामुळे शकुबाईचे दोन्ही हातांची बोटे निकामी झाल्याने त्यांना हाताने निट जेवताही येत नसून काेणतीच कामे करता येत नसल्याने त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र व मदतीची गरज आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fight of Shakubi who participated in the Long March has been a success