निजामपूरला बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

भगवान जगदाळे
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत निजामपूर (ता.साक्री) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुमारे साडेपाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला असून रणजित वामन विश्वास (वय-50) असे त्या कथित डॉक्टरचे नाव आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत निजामपूर (ता.साक्री) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुमारे साडेपाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला असून रणजित वामन विश्वास (वय-50) असे त्या कथित डॉक्टरचे नाव आहे.

 27 सप्टेंबरला संशयित डॉक्टरविरुद्ध आरोग्य विभागाला लेखी तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास जैताणे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षवर्धन चित्तम यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. पथकात डॉ. चित्तम यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित पावरा, डॉ. सयाराम पावरा, कक्षसेवक एम.एस. पाटील, पोलीस कर्मचारी श्री.भदाणे आदींचा समावेश होता. या धडक कारवाईमुळे माळमाथा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यावेळी तथाकथित डॉक्टर रणजित विश्वास याच्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी आढळून आली. काही रूग्णांना पलंगावर आय.व्ही. (सलाईनद्वारे) औषधोपचार सुरू होता. तर काहींची ते स्वतः तपासणी करत होते. पथकाने परवान्याची मागणी केली असता त्याच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा कोणत्याही प्रकारचा ऍलोपॅथी औषधोपचार करण्याचा शासकीय परवाना आढळून आला नाही. चौकशीअंती त्याच्याकडे केवळ पॅरामेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची निसर्गोपचार पदविका असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पथकाने पंचांसमक्ष दवाखान्याची झडती घेतली असता सुमारे साडेपाच हजार रुपये किमतीचा औषधसाठा, तपासणी साहित्य, दवाखान्यात लागणारी इतर औजारे, दवाखान्यात वापरलेल्या रिकाम्या बॉटल आदी मुद्देमाल जप्त केला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी संबंधित मुद्देमालासह निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तथाकथित संशयित डॉक्टर रणजित विश्वास याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पाटील घटनेचा पुढील तपास करीत आहेत...

"संशयित बोगस डॉक्टरला काही वर्षांपूर्वी शासनाने दोनदा नोटिसा दिल्यानंतरही त्याचा राजरोसपणे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता. आरोग्य विभाग यापुढे अशा बोगस डॉक्टरांची गय करणार नाही."
- डॉ.हर्षवर्धन चित्तम, वैद्यकीय अधीक्षक, जैताणे ग्रामीण रुग्णालय, वर्ग-1

"परिसरात विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांसह विनापरवाना औषधविक्री करणाऱ्या बोगस मेडिकल व्यावसायिकांवरही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे."
- भालचंद्र कोठावदे, सामाजिक कार्यकर्ते, निजामपूर ता.साक्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: filed a complaint against bogus doctor in Nizampur