‘अग्निशमन’चे नवीन कार्यालय धूळ खात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

जळगाव - शहरातील काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानाला लागून असलेले महाबळचे अग्निशमन विभागाचे कार्यालय सहा महिन्यांपासून बांधून पडून आहे. या ठिकाणी महापालिकेचे बांधकाम, पाणीपुरवठा व वीज विभागाचे अद्ययावत कार्यालय असूनही अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ते पडून आहे. 

जळगाव - शहरातील काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानाला लागून असलेले महाबळचे अग्निशमन विभागाचे कार्यालय सहा महिन्यांपासून बांधून पडून आहे. या ठिकाणी महापालिकेचे बांधकाम, पाणीपुरवठा व वीज विभागाचे अद्ययावत कार्यालय असूनही अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ते पडून आहे. 

महाबळ परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाबळ रस्त्यावरील भाऊंच्या उद्यानाशेजारी अग्निशमन, बांधकाम, पाणीपुरवठा व विद्युत विभागाच्या अद्ययावत कार्यालय जैन इरिगेशनने बांधून दिले. मात्र हे अद्ययावत व सुसज्ज कार्यालय गेल्या सहा महिन्यांपासून धूळखात पडले आहे. महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या कार्यालयाचे उद्‌घाटन झाले नसल्याने दौलतनगरची पाण्याच्या टाकीवर बांधकाम, पाणीपुरवठा, वीज विभागाचे तर सागर पार्क येथे अग्निशमनचे कार्यालय हे सुरू आहे.  

कार्यालयात सुसज्ज व्यवस्था
नगरसेवक नितीन बरडे यांनी या कार्यालयाचे बांधकाम भाऊंच्या उद्यानाचे काम झाल्यानंतर जैन कंपनीकडून करून घेतले. या ठिकाणी तीन विभागाचे काम होईल एवढ्या खोल्या. स्वच्छता गृह, कर्मचाऱ्यांना जेवणासाठी व आराम करण्यासाठी खोल्या, अग्निशमन विभागाचा बंब भरण्याची व्यवस्था, अशा अद्ययावत सुविधा असून, हे कार्यालय उद्‌घाटनाविना पडून आहे. 

...नागरिकच उद्‌घाटन करतील
कार्यालयांचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. परंतु अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या चारही कार्यालयांचे उद्‌घाटन होत नाही. त्यामुळे बांधलेल्या कार्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी असून, कोणी उद्‌घाटन केले नाही तर आम्हीच या कार्यालयाचे उद्‌घाटन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. 

महाबळ रस्त्यावर बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत व अग्निशमन विभागाचे कार्यालय हे जैन इरिगेशनच्या माध्यमातून बांधण्यात आले. लोकसहभागातून या कार्यालयात संगणक व इतर सुविधादेखील केल्या आहेत; परंतु हे कार्यालय अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना नकोसे वाटत असल्याने उद्‌घाटन थांबले आहे. 
- नितीन बरडे, नगरसेवक

Web Title: Fire Brigade New Office