नांदगावच्या उद्यानाला लागली आग; आपत्तीव्यवस्थापनाचे पितळ पडले उघडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

शहरात मालेगाव रस्त्यावर बस थांबा व मुख्य प्रवेश असलेल्या शनी मंदिर परिसरात दुपारी अचानक उत्तर दिशेकडून आगीचे लोळ दिसू लागल्याने नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली.

नांदगाव - शहरातील एकमेव विरुंगुळ्याचे ठिकाण असलेल्या शनी मंदिर जवळ असलेल्या उद्यानाला भर दुपारी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने जागरूक नागरिक धावून आल्याने आग आटोक्यात आली. मात्र उद्यानाच्या पश्चिम कोपऱ्यात असलेली लहानमोठी झुडपे व काही झाडे या आगीत जळून खाक झालीत. कडक उन्हाच्यामुळे आडोशाला बसलेल्या अज्ञात इसमाकडून बिडी अथवा तत्सम ज्वलनशील पदार्थामुळे सदरची आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शहरात मालेगाव रस्त्यावर बस थांबा व मुख्य प्रवेश असलेल्या शनी मंदिर परिसरात दुपारी अचानक उत्तर दिशेकडून आगीचे लोळ दिसू लागल्याने नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, टक्सी युनियनचे पदाधिकारी दीपक भावसार, रामदास बावणे, समाधान दाभाडे, सुलतान शाह, बाळासाहेब पवार, अरबाझ कलीम मनियार, रामभाऊ बनबेरू अशा अनेकांनी जवळून बादल्या आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान नगरपालिकेचा पाणी पुरवठ्याचा ट्रक्टर आणून पाईप लाईन जोडून त्यावर पाणी मारण्यात आले. तोपर्यंत नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती.

नांदगाव नगरपालिकेचा नवा कोरा बंब चालकाची नियुक्ती झालेली नसल्याने दोन वर्षांपासून एकाच जागी उभा आहे. आपात्कालीन व्यवस्थेसाठी शासनाने तालुकास्तरावर व नगरपरिषद स्तरावर अनेक समित्या व उपाययोजना केलेल्या असतांना त्या येथे दिसत नाहीत, अशी चर्चा आग विझवितांना नागरिक करतांना दिसून आले. छगन भुजबळांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने ही बाग बनवली आहे. त्यानंतर आज तिची देखभाल नांदगाव नगरपरिषदेकडे आहे. बागेत अनेक व्यायामाची साधने परिषदेने उपलब्ध करून दिली आहेत. ज्येष्ठ नागरिक येथे फिरायला येत असतात. फुकटात मिळालेल्या बागेची किमान देखभाल व्यवस्थित व्हावी. नागरिकांनी हा ठेवा जपावा. जेणेकरून नांद्गावकरांचे विरंगुळ्याचे एकमेव साधन टिकून राहील, अशी अपेक्षा माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी व्यक्त केली.  

Web Title: Fire broke out in Nandgaons park