कष्टकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी

कष्टकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी

रमजानबाबानगरमधील अग्नितांडवात आठ ते दहा घरे खाक; पाच जखमी

धुळे - शहरातील ऐंशी फुटी रोडवरील नटराज चित्रपटगृहासमोर असलेल्या रमजानबाबा नगरमधील कष्टकऱ्यांच्या आठ ते दहा घरांना बुधवारी (ता. १) पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाचे बंब उशिरा पोहोचल्याने आणि पुरेशा साहित्याअभावी आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात संबंधित कुटुंबांची घरे खाक झाली. या घटनेत पाच जण जखमी झाले.   

कच्चे बांधकाम व लाकडी घरे असलेल्या रमजानबाबानगरमध्ये या घटनेमुळे स्मशान शांतता पसरली आहे. संबंधितांच्या संसाराची राखरांगोळी झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी विविध पक्ष, संघटनांसह नातेवाइकांची रीघ लागली. शॉर्ट- सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पहाटे अडीचनंतर सुरू झालेला अग्नितांडव पहाटे सहानंतर नियंत्रणात आला.  

लाखोंचे नुकसान
आग लागल्याचे निदर्शनास येताच अनेकांची आरडाओरड सुरू झाल्याने जिवाच्या आकांताने मुला-बाळांसह संबंधित पीडित कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेतली. आग विझविण्याच्या प्रयत्नात चार ते पाच जणांचे हातपाय भाजल्याने दुखापत झाली. घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

रमजानबाबा नगरमध्ये बहुतांशी मजूर कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर ती दुसऱ्या घरांपर्यंत गेली. यात दहा ते अकरा घरे आगीच्या विळख्यात लपेटली आणि आठ ते दहा घरे खाक झाली. अनेकांनी स्वत:च्या घरातील काही साहित्य वाचविण्यासाठी धडपड केली. परंतु, आग मोठ्या प्रमाणात असल्याने संसारोपयोगी वस्तू, रोकड, कपडे, धान्य आदी आगीत खाक झाले.
 

लाखोंचे नुकसान; पंचनामे सुरूच

घटनेत फिरोजाबी बिस्मिल्ला शाह या विधवा महिलेचे दुमजली घर आहे. त्यांच्या घरातील ६५ हजार ५०० रुपये, सोने चांदीचे दागिन्यांचे नुकसान झाले. अख्तर हुसेन अब्दुल लतीफ यांच्या घरातील एक लाखाचे संसारोपयोगी साहित्य, ८० हजारांची रोकड, साखरपुड्यासाठी खरेदी केलेले साहित्य, रक्कम सोन्याचे दागिने खाक झाले. शहनाज नावाच्या महिलेचे ४० हजार रुपये, मुमताजच्या घरातील ४० हजारांची रोकड, दागिन्यांसह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. अब्दुल लतीफ शेख यांच्या घरातील दहा हजारांची रोकड, विवाह सोहळ्यासाठी खरेदी केलेले एक लाखाचे साहित्य, गनी बिस्मिल्ला शाह यांच्या घरातील ४८ हजारांची रोकड सोने-चांदीचे दागिने, सादिक इस्माईल शाह, अब्दुल शहीद अब्दुल अजीज यांचे महत्त्वाचे कागदपत्र, संसारोपयोगी साहित्य खाक झाले. आगीत सुमारे अडीच ते तीन लाखांची रोकड खाक झाली असून संसारोपयोगी साहित्य, विवाह व साखरपुड्यासाठी खरेदी केलेले साहित्यही खाक झाले. पीडित रहिवाशांचे आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, घरपट्‌टी भरल्याची पावती, बॅंकेचे पासबुक, शालेय साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे खाक झाली आहेत. महापौर कल्पना महाले, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, माजी उपमहापौर फारुक शाह, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव, ‘एलसीबी’चे निरीक्षक देविदास शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ, नीलेश काटे, युसूफ पिंजारी यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी पाहणी केली. 

तीन लाखांची रोकड खाक
शफीक आणि रुकसाना या भाऊ-बहिणीचा विवाह ठरला आहे. त्यांची सोहळ्यासाठी साहित्य खरेदी सुरू होती. त्यांनी बॅंकेतून दोन लाखांची रोकड काढून आणली होती, तर लाख रुपये घरात जमविले होते. अग्नितांडवात ही तीन लाखाची रोकड खाक झाली. त्यामुळे त्यांचा विवाह सोहळा कसा करायचा? या विवंचनेत पीडित कुटुंब आहे.

अग्नी उपद्रवाची नोंद
शाबान शेख रमजान शेख (वय ४६) यांनी दिलेल्या माहितीनुसार आझादनगर पोलिस ठाण्यात अग्नी उपद्रवाची नोंद झाली. महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून रात्रीपर्यंत पंचनामा सुरू होता. त्यामुळे नुकसानीची वस्तुस्थिती उद्या समजू शकेल. घटनेबाबत आझादनगरचे पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. त्यांनीही स्थिती नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्न केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com