फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प; पहूरच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

 आपण समाजाचे एक देणे लागतो, या कृतार्थ भावनेतून पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेने खर्चाणेवाडी (ता. जामनेर ) आणि राजेश्री कोटेक्स जिनिंगवरील 70 गोर-गरीब महिलांना साड्या व फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
 

पहूर (जामनेर)- आपण समाजाचे एक देणे लागतो, या कृतार्थ भावनेतून पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेने खर्चाणेवाडी (ता. जामनेर ) आणि राजेश्री कोटेक्स जिनिंगवरील 70 गोर-गरीब महिलांना साड्या व फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

महात्मा फुले यांच्या समाजसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प करित फटाके न फोडता बचत झालेल्या पैश्यांतून तसेच संचालक मंडळ व शिक्षकांनी योगदान देत वाडीवस्तीवरील गोरगरीब कुटूंबियांसोबत दिवाळी सण साजरा केला. फटाके फोडून मिळणाऱ्या आनंदापेक्षा गोरगरीबांच्या चेहऱ्यावरील आनंद मोठा असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांनी व्यक्त केली.

फटाके मुक्त दिवाळी साजरी करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी संस्थेचे सचिव भगवान घोंगडे, संचालक तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना बनकर, विज्ञान शिक्षिका माधुरी बारी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संचालक शंकर घोंगडे, समाधान पाटील, रामभाऊ बनकर, अर्जुन लहासे, रंगनाथ पाटील, अजय देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी मानले. या सामाजिक उपक्रमाचे पालकांनी कौतूक केले.

Web Title: Fireworks Free Diwali Resolution; The activities of the Mahatma Phule Shikshan Sanstha