मालकी हक्कावरून भावाने झाडली गोळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नाशिक - गुळवंच (ता. सिन्नर) येथील राहत्या घराच्या मालकी हक्कावरून धाकट्या भावाने थोरल्या भावावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कट्ट्यातून सुटलेली गोळी अंकुश एकनाथ भाबड यांच्या गालाला चाटून गेली. या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांत प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विष्णू एकनाथ भाबड (वय ४७, रा. गुळवंच, ता. सिन्नर) यास अटक करण्यात आली आहे. 

ठाण्याचे उपजिल्हाधिकारी अंकुश एकनाथ भाबड (वय ५७, रा. कुकरेजा कॉम्प्लेक्‍स, भांडूप पश्‍चिम, मुंबई, मूळ रा. गुळवंच, ता. सिन्नर, जि. नाशिक) हे सुटीनिमित्ताने गावी आले होते. रविवारी (ता. २९) रात्री आठच्या सुमारास अकुंश भाबड हे त्याचे मित्र त्र्यंबक ताडगे यांच्याबरोबर घरी गप्पा मारत बसले होते. त्या वेळी त्यांचा धाकटा भाऊ संशयित विष्णू भाबड हा आला. त्याने सामाईक घर माझ्या नावावर कर, नाहीतर त्या मोबदल्यात एक लाख रुपये दे. अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी श्री. ताडगे यांनी त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला. संशयित विष्णू याने त्याच्याकडील गावठी कट्टा काढून अंकुश यांच्या दिशेने रोखला. त्या वेळी झटापट होत संशयिताने गोळी झाडली. सुदैवाने गोळी अंकुश यांच्या गालाला चाटून गेली. घटनेनंतर संशयिताने पलायन केले. जखमी अंकुश भाबड यांना तातडीने नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सिन्नर एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे घटनास्थळी दाखल झाले. विभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयित विष्णू भाबड यास काही तासांमध्ये अटक केली. न्यायालयात हजर केले असता, शनिवारी (ता. ५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

जीवदान देणाऱ्या भावावर जीवघेणा हल्ला
संशयित विष्णू भाबड याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. अंकुश भाबड यांनीच तीन महिन्यांपूर्वी त्याच्यावर उपचार करून ठीक केले. तसेच विष्णू भाबड याचा एक मुलगाही शिक्षणासाठी अंकुश भाबड यांच्याकडे मुंबईला आहे. तरीही संपत्तीच्या लालसेपोटी संशयित विष्णू भाबड याने जीवदान देणाऱ्या भावालाच गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संशयिताने पोलिस तपासात गावठी कट्टा दारणा नदीपात्रात फेकल्याचे सांगितले. मात्र सध्या नदीला आवर्तन सोडलेले असल्याने गावठी कट्टा सापडू शकलेला नाही.

Web Title: firing crime