कोण.. अरबाज पिंजारी, याला कधी पाहिले नाही!

Firing
Firing

जळगाव - वाघनगरातील रहिवासी तथा माजी नगरसेवक संतोष अाप्पा पाटील यांच्यावर सोमवारी (ता. ३१) सकाळी दहाला आर्यन पार्कजवळ प्राणघातक हल्ला चढवून गोळीबार करण्यात आला. गोळी छातीतून आरपार निघूनही पाटील सुखरूप असून, त्यांना पोलिसांत स्वत:हून हजर झालेल्या अरबाज पिंजारीचे छायाचित्र दाखवून उपविभागीय पोलिस अधिकारी निलाभ रोहन यांनी विचारपूस केली. पोलिसांच्या ताब्यातील या व्यक्तीला यापूर्वी कधीच बघितले नाही किंवा त्याच्याशी काहीएक संबंध आलेला नसल्याचे वारंवार पाटील यांनी ठासून सांगितले.

माजी नगरसेवक पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अकरा तासानंतर रात्री नऊला अरबाज पिंजारी नावाचा तरुण तालुका पोलिसांत स्वत:हून हजर झाला. सकाळी झालेल्या गोळीबारात आपण असल्याचे त्याने सांगितल्यावर पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, निरीक्षक बापू रोहोम, निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह पथकाने अरबाजला रात्रीतून चौकशीला सुरवात करीत त्याला नंतर घडलेल्या घटनाक्रम विचारण्यात आला. त्याला पोलिस गाडीत पुढे बसवून पोलिस ठाणे ते घटनास्थळ असा मार्ग दाखवण्याचे सांगितल्यावर त्याने तेही व्यवस्थितपणे सांगितले. घटनास्थळावरील वाहने कुठे पडली होती, तेही दाखवले. वाहनाजवळ सापडून आलेली कॅरीबॅग आणि त्यात काय होते, याची माहितीही त्याने दिल्याने पोलिसांना तोच मारेकरी असल्याची खात्री झाली. मात्र, अरबाज पिंजारी गोळी मारण्यामागचे कारण सांगत असलेल्या तथ्याशी घटना सध्यातरी जुळून येत नाही. परिणामी, तालुका पोलिस ठाण्यात मोटारसायकलचालक अनोळखी, गोळी मारणारा अज्ञात या दोघांसह बुधा दला हटकर, कैलास बुधा हटकर, लखन नारायण हटकर, राहुल सुरेश हटकर, ईश्‍वर तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी निलाभ रोहन करीत आहेत. 

‘हटकर गॅंग’नेच रचला कट  
जखमी संतोष पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन उपअधीक्षक सचिन सांगळे यांची भेट घेत आपल्या जीविताला धोका असल्याचे सांगितले होते. भुसावळ येथील काही शुटर गुंडांना अगोदर ‘सुपारी’ देण्यात आली होती. त्यानंतर कोणीही काम करण्यास तयार होत नाही म्हणून अचानक जिगर बोंडारे व अरमान पिंजारी या दोघेही अट्टल गुन्हेगारांना हाताशी धरुन त्यांची कारागृहातून जामीन करवून दिल्यावर त्यांनी हल्ला चढवला. ‘हटकर गॅंग’नेच हा कट रचून गुन्ह्यात आपले नावे येणार नाही, याची खबरदारी घेत या दोघांना पुढे करण्यात आल्याचे पाटील कुटुंबीयांनी सांगितले.

दसरा-दिवाळीत होता ‘गेम’
कारागृहातून बाहेर आलेल्या अरबाज आणि जिगर यांच्याशी बोलणी झाल्यावर त्यांनी चोपडा तालुक्‍यातील सातपुडा पर्वतातून गावठी कट्टे व काडतुसे मिळविली होती. चारचाकी वाहनाने जळगावच्या दिशेने येताना त्यांचा अपघात झाला. यात कार उलटल्याने जखमी होऊन त्यातील सर्व पसार झाले होते. त्याच वेळेस जर रिव्हॉल्व्हर त्यांना मिळाल्या असत्या आणि अपघात झाला नसता, तर दसरा किंवा दिवाळीच्या आधीच त्यांच्याकडून संतोष पाटलांवर हल्ला झाला असता, अशी माहिती आता समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com