कसायाच्या दारातून सोडवून आणली..शेतकऱ्यांची ती लक्ष्मीमाता!

संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

कसायाला विकलेली गाय एका संवेदनशील युवा शेतकऱ्याने अवघ्या ५०० रुपयाला विकत घेतली अन सांभाळली. आज पर्यंत या गायींने सतत देखण्या वासरांना जन्म दिला असून वासरे पुढे शेतीसाठी शेतकऱ्याचे बैल म्हणून कामाला आल्याने त्यांच्या विक्रीतून या शेतकऱ्याला लाखाचा फायदा झाला आहे.

नाशिक : घरापुढील गोठ्यात बांधलेली गाय म्हणजे शेतकऱ्यांसाठी साक्षात लक्ष्मी माताच...या मातेची पूजा केल्याचे पुण्य लाभते असा समज आजही असून याचा प्रत्यत राजापूर येथील एका शेतकऱ्याला आला आहे. कसायाला विकलेली गाय एका संवेदनशील युवा शेतकऱ्याने अवघ्या ५०० रुपयाला विकत घेतली अन सांभाळली. आज पर्यंत या गायींने सतत देखण्या वासरांना जन्म दिला असून वासरे पुढे शेतीसाठी शेतकऱ्याचे बैल म्हणून कामाला आल्याने त्यांच्या विक्रीतून या शेतकऱ्याला लाखाचा फायदा झाला आहे.

पाचशे रुपयाच्या गाईने दिले लाखांच्या वर उत्पन्न

वैदिक काळापासून भारतात गायीचा महिमा गाजत आला आहे. गाय आपल्या संपूर्ण जीवनात ४ लाख १० हजार ४४० लोकांना खाद्य पुरवते. गाईचं दूध, मूत्र, शेण शिवाय दुधापासून तूप, दही, ताक, लोणी हे सर्व उपयोगी पदार्थ आहेत. भगवान श्रीकृष्णानेही गाईचं महत्व वाढवण्यासाठी गाय पूजा आणि गौशालांची निर्मिती केली आहे, इतके पुरतन महत्व असल्याने आजही गाय शेतकर्यांसाठी लक्ष्मीच आहे.

शेतकऱ्यांसाठी लक्ष्मीमाता बनून आली हे नक्की!

राजापूर येथील तरुण शेतकरी दत्तात्रेय घुगे यांनी १४ वर्षांपूर्वी एका कसायाला कोणीतरी विकलेली गाय अवघ्या ५०० रुपयात विकत घेतली होती. लक्ष्मीमाता असलेल्या गाईचे मरण कसायाच्या दारी नको या धार्मिक वृतीतून जगेल तोवर तिला मी सांभाळेल असा निश्चय करत त्याने या गाईला खरेदी केले होते. ही गाय जणू त्या शेतकऱ्याची गोमाता झाली असल्याने संपूर्ण कुटुंबाने तिचा लाडिकपनाने सांभाळ केला आहे. गाईने या शेतकऱ्याला आत्तापर्यंत सुमारे १० वेळेस गोऱ्हे म्हणजे बैल जन्माला दिले.या वेळेस पण या लक्ष्मीने ज्या वासराला जन्म दिला तो दिवसही लक्ष्मीपुजनाचा होता हे विशेष..!
हि गायच देखणी असल्याने तिने जन्माला दिलेले गोऱ्हे देखील राजबिंड व देखणे असल्याने त्यांना शेतीकामासाठी चांगलीच पसंती मिळाली आहे. या गोऱ्हयाच्या (बैल) शेतकऱ्यांनाच विक्रीतून सदरच्या शेतकर्याला आतापर्यंत लाखो रुपयांची कमाई झाली आहे. कसायाच्या तावडीतून सोडवत पुर्नजन्म दिलेली ही गोमाता जणू त्या शेतकऱ्यांसाठी लक्ष्मीमाता बनून आली हे नक्की!

गाईने कृतज्ञताच व्यक्त केली जणू

“कसायला विकलेली गाय डोळ्यादेखत नेली जात असल्याने मला पहावली नाही.यामुळे सदरची गाय खरेदी केली व आजपर्यंत सांभाळली आहे.किंबहुना शेवटच्या श्वसापर्यत मी तिचा सांभाळ करेल.विशेष म्हणजे या गायीने नेहमीच वासरांना जन्म देऊन कृतज्ञताच व्यक्त केली आहे.”- दत्तात्रय घुगे,शेतकरी,राजापूर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred rupees cow gives lots of income Nashik News