धुळ्यात पाच जणांची दगडाने ठेचून हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

धुळे/आमळी - आदिवासीबहुल साक्री तालुक्‍यातील राईनपाडा (जि. धुळे) येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून ग्रामस्थांनी अत्यंत अमानुषपणे पाच जणांची दगडांनी ठेचून हत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. यातील चार जण मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील, तर एक जण कर्नाटकातील आहे. सर्व मृत नाथपंथीय डवरी समाजातील असून, गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्यांतील आहेत. सध्या त्यांचा तळ घटनास्थळाजवळील पिंपळनेर येथे होता. जिवाचा थरकाप उडविणारी ही घटना केवळ गैरसमजातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजी यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली.

पिंपळनेरपासून (ता. साक्री, जि. धुळे) २५ किलोमीटरवर नवापूर (जि. नंदुरबार) सीमेवर राईनपाडा गाव आहे. तेथे आज आठवडे बाजार होता. त्या वेळी दुपारी बाराच्या सुमारास एसटी बस राईनपाड्यात दाखल झाली. बसमधून पाच व्यक्ती उतरल्या. त्या ३५ ते ५० या वयोगटातील होत्या. त्यांच्या हातात बॅग व पिशव्या होत्या. ते साध्या वेशात असल्याने आपण भिक्षेकरी आहोत, या त्यांच्या म्हणण्यावर कुणीही विश्‍वास ठेवला नाही. त्यापैकी दोघांनी बाजारात फिरणाऱ्या एका मुलीला जवळ बोलविले. त्यांच्यात काहीतरी संवाद झाला. मात्र, त्या मुलीने लागलीच घरी पळ काढत घरच्यांना त्याविषयी सांगितले अन्‌ बाजारात एकच हल्लकल्लोळ उडाला. 

ग्रामस्थांनी एकत्र येत पाच ते सहा जणांना पकडले आणि बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यामुळे बाजार त्वरित बंद झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ते पाचही जण आपण मुले पळविणारे नसून भिक्षेकरी आहोत. आमच्याकडे आधार कार्ड आहे, अशी विनवणी करत होते. मात्र, संतापलेले ग्रामस्थ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पाचही जणांना कुणी दगडाने, कुणी लोखंडी रॉडने तर कुणी विटांनी अक्षरशः ठेचून काढले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघांचा उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर, साक्रीहून पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले; पण जमाव इतका प्रक्षुब्ध झाला होता, की त्यापैकी काहींनी पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांनी या घटनेची माहिती विचारली असता आणि इतके टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी पोलिसांना कळविणे महत्त्वाचे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता निर्माण झालेल्या वादातून संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवरही हल्ला केला. 

सध्या राईनपाड्यात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. मात्र, संपूर्ण ग्रामस्थ जंगलाकडे निघून गेल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे.

सभोवतालच्या वातावरणातील भय, विद्वेष, वैमनस्य, सूड, गैरसमज, अविश्‍वास, अगतिकता, नैराश्‍य आणि वैयक्तिक चुकांमुळे मेटाकुटीला आलेला माणूस आता कडेलोटाच्या उंबरठ्यावर उभा आहे की काय? अशी शंका यावी, असा आजचा रविवारचा दिवस घातवार ठरला. महाराष्ट्रातील धुळे येथे जमावाने केवळ अफवेपोटी पाच जणांना ठेचून मारले, तर दिल्लीत एका कुटुंबातील ११ लोकांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडले. वाहन अपघातात उत्तराखंडमध्ये ४८ भाविकांवर, तर महाराष्ट्राच्याच गडचिरोलीमध्ये ७ जणांवर काळाने घाला घातला. त्याशिवाय देशभरातील छोटे-मोठे अपघात, दुर्घटनांसह आत्महत्येने शेकडो जणांना प्राण गमवावे लागले आणि त्याच्या यातना सर्वसामान्यांच्या मनावर कोरल्या गेल्या. 

Web Title: Five people stoned to death