कजगावात 'गुटखा किंग'वर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी दोन व्यापाऱ्यांच्या दुकानांवर आज अचानक धाड मारून सुमारे दोन लाखांचा गुटखा जप्त केला. 'गुटखा किंग' समजल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांवरच कारवाई झाल्याने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

चाळीसगाव - गुटखा विक्रीचे परिसरातील मुख्य केंद्र असलेल्या कजगाव (ता. भडगाव) येथे जळगावच्या अन्न, औषध प्रशासनात नव्यानेच नियुक्त झालेले अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी दोन व्यापाऱ्यांच्या दुकानांवर आज अचानक धाड मारून सुमारे दोन लाखांचा गुटखा जप्त केला. 'गुटखा किंग' समजल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांवरच कारवाई झाल्याने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

जळगावला अन्न, औषध प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून विवेक पाटील यांनी 25 जूनला पदभार घेतल्यानंतर आपल्या खबऱ्यांना त्यांनी आल्या आल्या कामाला लावले. त्यानुसार, कजगावला दोघा व्यापाऱ्यांकडे गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती श्री. पाटील यांना मिळाली. त्यानुसार आज त्यांनी अचानक धडक देऊन कजगावातील गुरुप्रसाद प्रोव्हिजन या दुकानावर तपासणी केली असता, जितेंद्र टाटिया यांच्या मालकीचे असलेल्या या दुकानावर प्रतिबंधित अन्नपदार्थांमध्ये समावेश असलेल्या विमल, सागर तसेच इतर प्रतिबंधित गुटखा मिळून आला. मिळालेल्या गुटख्याची किमत 1 लाख 20 हजार रुपये आहे. दुसरी कारवाई कजगावातच छोटू इंदरचंद जैन यांच्या दुकानावर केली. या ठिकाणी सागर गुटख्यासह रॉयल 717, सुगंधित सुपारी मिळून आली. या मालाची किमत सुमारे 84 हजार आहे. ही कारवाई करतेवेळी विवेक पाटील यांच्यासोबत सहाय्यक योगेश बेंडकुळे उपस्थित होते. 

कजगावात केलेल्या कारवाईत जप्त केलेला गुटखा व सुगंधित सुपारी नियमानुसार नष्ट केली जाईल. जिल्ह्यात कुठेही गुटखा विक्री होत असल्यास, कारवाईचे सत्र सुरूच ठेवू. 
- विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, जळगाव

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Food drug administration seized gutkha of two lakhs in kajgaon