‘तनिष्का’ बाजारहाटद्वारे धान्य महोत्सव भरवावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

जेल रोड - ग्रामीण व शहरी महिलांनी उत्पादन व बाजारपेठ यांचा समन्वय साधत ‘तनिष्का’ बाजारहाटच्या माध्यमातून धान्य महोत्सव भरवावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे अधिष्ठाता डॉ. नितीन ठोके यांनी केले.

जेल रोड - ग्रामीण व शहरी महिलांनी उत्पादन व बाजारपेठ यांचा समन्वय साधत ‘तनिष्का’ बाजारहाटच्या माध्यमातून धान्य महोत्सव भरवावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे अधिष्ठाता डॉ. नितीन ठोके यांनी केले.

जेल रोडला समर्थ ‘तनिष्का’ गटाने बचतगटांच्या महिलांसाठी घेतलेल्या रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सौरउर्जेवर वाळविल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे प्रणेते तथा तरुण उद्योजक गोवर्धन कुलकर्णी, सिन्नर येथील उद्योजिका रूपालीताई मिठे, पाथर्डी येथील ‘तनिष्का’ गटप्रमुख अस्मिता देशमाने, ‘तनिष्का’ समन्वयक विजयकुमार इंगळे व ॲड. सुनील बोराडे प्रमुख पाहुणे होते.

श्री. ठोके म्हणाले, की बचतगटाच्या महिलांनी अन्नप्रक्रिया उद्योगाकडे भविष्यातील संधी म्हणून पाहावे. या महिलांकडे विविध वस्तू बनविण्याचे कौशल्य असते. फक्त त्यांनी बनविलेल्या मालाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मार्केटिंगची जोड दिल्यास सर्वसाधारण महिलांची आर्थिक प्रगती होईल. शिवाय, महिलांनी कुकुटपालन, बकरी उद्योग, मसाला बनविणे, मेणबत्ती उद्योग, फळबाग लागवड व यंत्र बॅंक यांसारख्या पारंपरिक उद्योगाकडे आर्थिक स्रोत म्हणून पाहावे. यासाठी कृषी उद्योग केंद्र सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही ठोके यांनी दिली.

समर्थ ‘तनिष्का’ गटातर्फे जेल रोड परिसरातील कला, क्रीडा, साहित्य व आदर्श बचतगटाच्या महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ‘तनिष्का’ सदस्या पल्लवी बोराडे, निशा डेर्ले, कामिनी आहेर व सदस्यांनी मेहनत घेतली. समर्थ सेवा मंडळाच्या सदस्यांनी संयोजन केले. गोरख बोराडे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. इंगळे यांनी प्रास्ताविक केले.

महिलांना देणार रोजगार
सिन्नर येथील उद्योजिका मिठे यांनी सांगितले, की सर्वसाधारण महिलांना ‘तनिष्का’च्या व्यासपीठाच्या माध्यमातून शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन गणवेश शिवण्याचे काम देण्यात येईल. जेणेकरून माझ्या भगिनींना आपल्या घरीच रोजगार उपलब्ध होईल व महिलांचा आर्थिक उत्कर्ष होईल.

Web Title: food festival jail road