अखेर चाळीस वर्षांनंतर आला 'या' नदीचा "मोसम"

संतोष कांबळे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

यावर्षी ऑगस्टच्या सुरवातीलाच हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले. शिवाय धरण पाणलोट क्षेत्रात वेळोवेळी चांगला पाऊस होत गेला. त्यामुळे हरणबारी धरणक्षेत्रातून बऱ्याच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग होत राहिला. मोसम खोऱ्यात इतर लहान नद्या नाल्यांना आलेले पुराचे पाणी मोसमला मिळाले. त्यामुळे सलग तीन महिन्यांपासून मोसम नदी वाहत असून नदीपात्रातून वाहणारे नितळ पाणी मनाला आकर्षित करीत आहे.

नाशिक : बागलाण तालुक्यातील हरणबारी येथे उगम पावून मालेगाव शहराजवळ चंदनपुरी शिवारात गिरणा नदीला मिळणारी मोसम नदी तब्बल चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सलग तीन महिन्यांपासून वाहत आहे. समाधानकारक पावसामुळे मोसमला एवढ्या प्रदीर्घ कालावधीत तरुण पिढीने प्रथमच वाहताना पाहिले. तर जुन्या जाणकार व ज्येष्ठांनी नदीचे रुप पाहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Image may contain: one or more people, outdoor, nature and water

मोसम नदीवर बोटावर मोजण्याइतकेच होते ब्रिटीशकालीन बंधारे
सन 1969 नंतर प्रथमच एवढ्या कालावधीत मोसम वाहिली. 1969 मध्ये मोसम नदीला आलेल्या महापूरामध्ये वडेल गावच्या वेशीत पाणी शिरले होते. त्यावेळी मोसम नदीवर बोटावर मोजण्याइतकेच ब्रिटीशकालीन बंधारे होते. अजंग व वडेल या दोन गावांना जोडणारा पूल अस्तित्वात नव्हता. नदीपात्रातूनच प्रवाशांची वाहतूक होत असे. महापूर ओसरल्यानंतर मोसम नदीवर हरणबारी येथे धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला व सन 1980 साली हरणबारी धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. त्याशिवाय मोसम नदीवर द्याने, उत्राणे, नामपूर, जायखेडा, वडनेर, अजंग, वजिरखेडे, काष्टी अशा विविध ठिकाणी कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे बांधले गेले. बंधारे व धरणाच्या कामामुळे नदीचा प्रवाह ठिकठिकाणी अडवला गेल्याने मोसम नदीपात्रातून पाणी वाहण्याच्या घटना फक्त पावसाळ्यातच घडल्या.

नदीपात्रातून वाहणारं नितळ पाणी करतयं मनाला आकर्षित 

या वर्षी ऑगस्टच्या सुरवातीलाच हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले. शिवाय धरण पाणलोट क्षेत्रात वेळोवेळी चांगला पाऊस होत गेला. त्यामुळे हरणबारी धरणक्षेत्रातून बऱ्याच दिवसांपासून पाण्याचा विसर्ग होत राहिला. मोसम खोऱ्यात इतर लहान नद्या नाल्यांना आलेले पुराचे पाणी मोसमला मिळाले. त्यामुळे सलग तीन महिन्यांपासून मोसम नदी वाहत असून नदीपात्रातून वाहणारे नितळ पाणी मनाला आकर्षित करीत आहे.

Image may contain: sky, outdoor, nature and water

प्रतिक्रिया
1969 च्या महापुराअगोदर नदीपात्रातून कायम पाणी वाहत असायचे. मात्र हरणबारी धरणाच्या बांधकामानंतर चाळीस वर्षांमध्ये पाण्याच्या विसर्गाच्या वेळीच मोसम नदी वाहत असे. यंदा मात्र चांगल्या पावसामुळे मोसमचे जुने रुप पहायला मिळाले - विठ्ठल कांबळे, ज्येष्ठ नागरीक, वडेल

वडेल व अजंग गावादरम्यान वाहणारी मोसम नदी यंदा सलग तीन महिन्यांपासून वाहत आहे. गेल्या चाळीस वर्षांमधला हा विक्रम आहे. शांतपणे नितळ पाण्याने वाहणारी मोसम नदी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.- प्रा.बन्सीलाल शिरोळे, सेवानिवृत्त प्राध्यापक, वडेल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty years later, the Mosam River flows in succession