Bhusawal-Corporator
Bhusawal-Corporator

भुसावळ पालिकेचे चार नगरसेवक अपात्र

भुसावळ - पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जनआधार विकास पार्टीच्या चार नगरसेवकांना नगरविकास विभागाने अपात्र केले असून, पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश आज नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी काढले. या आदेशाने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भुसावळ पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा २७ मार्च २०१७ ला पालिका सभागृहात आयोजित केली होती. सभेची सुरवात शोक व शुभेच्छा प्रस्तावाने झाल्यानंतर विषयाचे वाचन होत असताना जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, रवींद्र सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे, संतोष चौधरी यांच्यासह आठ सदस्य सभागृहात हातात वेगवेगळे फलक घेऊन मुख्याधिकाऱ्यांना बाहेर  काढा, त्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही अशा घोषणा देत सभागृहात शिरले. 

तसेच कर्मचाऱ्याला विषयाचे वाचन बंद करण्यासाठी धमकावले. त्यानंतर अध्यक्षांनी समजावण्याचा प्रयत्न  करुनही गोंधळ सुरुच राहिल्याने सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करुन सभा आटोपली. सभा संपल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांचा हात पकडून त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी पोलिसांनी अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला. 

याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल असून तत्कालीन मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी जनआधारच्या नगरसेवकांवर कारवाईबाबत नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.  या प्रस्तावावर चर्चा होवून दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, रवींद्र सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे, संतोष चौधरी यांना अपात्र केले असून पुढील पाच वर्ष निवडणूक लढवण्यासाठी बंदी घातली आहे. 

गुंडगिरीला जरब - रमण भोळे
पालिका सभा शहराच्या विकासासाठी होतात मात्र, विरोधी नगरसेवकांनी गुंडगिरीने सभा उधळणे योग्य नसून त्यांच्या अपात्रतेमुळे गुंडगिरी करणाऱ्या नगरसेवकांवर जरब बसणार आहे. अपात्रतेची कारवाई योग्य आहे असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले. 

राज्यात भाजपा युतीचे सरकार असून सत्तेचा गैरवापर करुन, आमच्या नगरसेवकांना नगरविकास राज्यमंत्र्यांनी बेकायदेशीररित्या अपात्र ठरविले आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार असून न्यायालयावर आमचा विश्वास आहे. 
- संतोष चौधरी माजी आमदार

विरोधी नगरसेवकांनी दादागिरीच्या आधाराने सभा उधळण्याचा प्रयत्न करणे व मुख्याधिकाऱ्यांना दमदाटी करणे समर्थनिय नाही. या प्रकरणात दोन्ही पक्षाचे युक्तीवाद, व्हीडीओ चित्रीकरण आदीच्या आधारे हा निर्णय दिला असून काळा चष्मा लावलेल्या त्यांच्या नेत्यांना मात्र यात काळेच दिसणार आहे. 
- संजय सावकारे आमदार, भुसावळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com