सप्तश्रृंगी मातेच्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात 4 जण ठार

दिगंबर पाटोळे    
सोमवार, 20 मे 2019

गाडीमध्ये पंधरा महिलांसह पंचवीस भाविक होते. त्यातील सात आठ युवक गाडीच्या खाली उतरुन गाडीतील भाविकांना दुसऱ्या वाहानाने नाशिकला रवाना करण्यासाठी दुसऱ्या वाहानाची प्रतिक्षा करीत असतांना रात्री बारा वाजेच्या दरम्यान वणी बाजूकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणारा मालवाहू ट्रकने आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या नादुरुस्त आयशर गाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक जागीच ठार तर तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहे. (वणी) गडावरुन नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या भाविकांवर मध्यरात्री काळाने घातला घाला.

त्रंबकेश्वर येथील मानिक ठाकूर, रा. त्रंबकेश्वर यांचेे मुलाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्रंबकेश्वर व नाशिक येथील पेठरोड व दिंडोरी रोड येथील नातेवाईक मंडळीसह पंचवीस ते तीस भाविक भाडोत्री आयशर गाडी ठरवून रविवारी सकाळी नाशिकहून साडे अकराच्या सुमारास सप्तश्रृंगी गडाकडे रवाना झाले होते. दुपारी दीड वाजता वणी गडावर पोहचल्यानंतर बोकड बळीचा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंंतर रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान गडावरुन ठाकुर कुटुंबीय घरी परतीच्या प्रवासाला निघाले. त्यांचे आयशर गाडी सप्तश्रृंगी गड ते नांदुरी हे दहा किमीचा घाट रस्ता उतरुन सुखरुप नांदुरी पर्यंत आले. परंतु तेथे नऊ वाजेच्या दरम्यान आयशर गाडी अचानक बंद झाली. यावेळा आयशर चालक व किन्नरने गाडीचा बिघाड दुरुस्ती करुन वाहन सुरु केले व नाशिक कडे येत असतांना परत दोन किमी अंतरावर पुन्हा गाडी बंद पडली. यावेळी पुन्हा चालकाने दुरुस्ती करुन गाडी सुरु केेेेले. पुढे दहा किमी अंतरावर वणी - नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथील गतीरोधकाजवळ रात्री साडे अकरावाजेच्या दरम्यान गाडी रस्त्यातच परत बंद पडली.

गाडीमध्ये पंधरा महिलांसह पंचवीस भाविक होते. त्यातील सात आठ युवक गाडीच्या खाली उतरुन गाडीतील भाविकांना दुसऱ्या वाहानाने नाशिकला रवाना करण्यासाठी दुसऱ्या वाहानाची प्रतिक्षा करीत असतांना रात्री बारा वाजेच्या दरम्यान वणी बाजूकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणारा मालवाहू ट्रकने आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी आयशरच्या पाठीमागे उभे असलेले  गणेश भगवतीप्रसाद ठाकुर वय ३१, कुणाल कैलास ठाकुर वय २५, सागर अशोक ठाकुर वय २३ सर्व रा. शनिमंदीर पेठरोड नाशिक व आशिष माणिक ठाकुर वय  ३०, रा. त्रंबकेश्वर हे दोन्ही गाडीच्या मध्ये सापडून जागीच ठार झाले. अपघातानंतर उभी असलेली आयशर वीस ते पंचवीस फुट पुढे जात रस्याच्या बाजुला गेली. यावेळी आयशरमध्ये बसलेले ललीताबाई अशोक ठाकुर वय ४५, अनिल रमेश ठाकुर वय ३५ रा. शनिमंदीर पेठ रोड नाशिक ध्रुप बिंद्राबन ठाकुर वय ४०, रंजिता ध्रुप ठाकुर वय ३२, रा. महालक्ष्मी टॉकीजजवळ नाशिक,  माणिक चिंतुलाल ठाकुर, वय ५५ रा. त्रंबकेश्वर, पल्लवी ठाकुर वय ४० रा. अकोला हे गंंभीर जखमी झाले तर इतर दहा ते बारा जण किरकोळ जखमी झाले.

अपघाताच्या आवाज, जखमी व नातेवाईकांच्या किंचाळ्यांनी कृष्णगांवचे ग्रामस्थ खडबडून जागे होत. पोलिस पाटील व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य करीत जखमींना लागलीच १०१ रुग्णवाहीका व इतर वाहानांनी वणी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. अपघातील मृतदेहांचा झालेला चेंदामेंदा रस्त्यावर सांडलेले मांस रक्त अपघाताचे भीषनता दर्शवीत होते. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला असून ट्रक चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान जखमींवर येथील ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नाशिक येथे हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाडवी, पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four dead in accident near Nashik