जळगाव शहरातील महामार्गावर चार उड्डाणपूल प्रस्तावित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

जळगाव : चौपदरीकरणाचे काम होताना महामार्ग शहराबाहेरून (बायपास) जाणार असला, तरी सध्या शहरातून जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण आणि आवश्‍यक त्या चौकांच्या ठिकाणी चार उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या पुलांसाठी पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या पुलांच्या कामाला तत्त्वतः मान्यता मिळाली असून त्यादृष्टीने "नही'तर्फे यासंबंधीचे सर्वेक्षणही सुरू झाले आहे.

जळगाव : चौपदरीकरणाचे काम होताना महामार्ग शहराबाहेरून (बायपास) जाणार असला, तरी सध्या शहरातून जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण आणि आवश्‍यक त्या चौकांच्या ठिकाणी चार उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या पुलांसाठी पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या पुलांच्या कामाला तत्त्वतः मान्यता मिळाली असून त्यादृष्टीने "नही'तर्फे यासंबंधीचे सर्वेक्षणही सुरू झाले आहे.

महामार्गावर नियमित होणारे अपघात व त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता समांतर रस्त्यांसह चौपदरीकणाच्या कामाला प्राधान्यक्रमाने पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून, लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. मात्र, चौपदरी मार्ग शहराबाहेरून (बायपास) जाणार असल्याने शहरातील महामार्ग रुंदीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या मार्गालगतच्या समांतर रस्त्यांचाही विषय सध्या चर्चेत आहे.

गेल्या वर्षी 25 जानेवारी 2016 ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी चौपदरी मार्ग शहराबाहेरून जात असल्याने शहरातील महामार्गावरही उड्डाणपुलांच्या कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार काही महिन्यांपूर्वीच शहरातील महामार्गावर चार ठिकाणी उड्डाणपुलांच्या प्रस्तावित कामाला तत्त्वत: मान्यता देण्यात आली.

या ठिकाणी होणार पूल
महामार्ग चौपदरीकरणात महामार्ग पाळधीच्या अलीकडे साईबाबा मंदिरापासून वळण घेऊन कानळदा, ममुराबादमार्गे तरसोद फाट्याजवळ मिळणार आहे. त्यामुळे पाळधीपासून थेट तरसोद फाट्यापर्यंतचा सध्याच्या महामार्गाचा प्रश्‍न कायम आहे. या मार्गावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, शासकीय तंत्रनिकेतन, इच्छादेवी व कालिंकामाता चौक अशा चार ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नही) सर्वेक्षणही सुरू केले आहे. या चारही चौकांत तांत्रिकदृष्ट्या उड्डाणपूल होऊ शकतात की नाही, याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर या कामांना अंतिम मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. या कामांसाठी जवळपास पाचशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

खासदारद्वयी प्रयत्नशील
गडकरींच्या गेल्या वर्षातील दौऱ्यात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसेंनी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर थेट बांभोरी पुलापासून कालिंकामाता चौकापर्यंत उड्डाणपूल करण्याबाबत सुचविले होते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या हे काम शक्‍य नाही. त्यामुळे या मार्गावर चार ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले. खासदार ए. टी. पाटील व रक्षा खडसे या कामांसाठी पाठपुरावा करीत आहेत.

Web Title: four flyovers on highways in jalgaon