हिशेबात अफरातफर करुन सात लाखांवर डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

जळगाव - येथील धान्य व अन्य स्वरुपाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या वेगवेगळ्या प्रतिष्ठानांत हिशेब करणाऱ्या कारकुनाने अफरातफर करून सात लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने फिर्याद दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव - येथील धान्य व अन्य स्वरुपाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या वेगवेगळ्या प्रतिष्ठानांत हिशेब करणाऱ्या कारकुनाने अफरातफर करून सात लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने फिर्याद दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अयोध्यानगर परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल नगरातील रहिवासी विष्णुकांत सिताराम मणियार (वय 60) यांचे दाणाबाजारात सिताराम शंकरलाल मणियार, जिल्हापेठ परिसरातील विष्णू विहारातील प्रथमेश पॉली प्रो आणि एमआयडीसीतील प्रथमेश प्लास्टिक अशी तीन वेगवेगळी प्रतिष्ठाने आहेत. त्यातील सिताराम मणियार हे विष्णुकांत हे बघतात तर उर्वरित दोघे फर्म त्यांचा मुलगा हरगोविंद मणियार यांच्या मालकीचे आहे. या तीनही प्रतिष्ठानांच्या हिशेबाचे काम गेल्या सात वर्षांपासून मुकूंद ब्रिजलाल तोष्णीवाल (रा. मुंदडानगर) हा बघत होता. यादरम्यान एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2016 या सहा महिन्यांच्या कालावधीतील हिशेबात काही तरी घोळ असल्याचा संशय मणियार यांना होता. यावरुन त्यांनी हिशेब पूर्ण पणे तपासला असता त्यात तीनही फर्ममधील हिशेबात 7 लाख 37 हजार रुपयांची अफरातफर झाल्याचे समोर आले. 

अशी केली अफरातफर 
दाणा बाजारातील सिताराम शंकरलाल मणियार या फर्ममधून 1 ऑगस्ट 2016 ते 2 सप्टेंबर 2016 दरम्यान मुकूंद तोष्णीवाल याने बॅंकेत भरण्यासाठी दिलेल्या पैशातून 1 लाख 65 हजार रुपये गायब केले. तर 22 जून 2016 ते 9 ऑगस्ट 2016 दरम्यान रोजचा मेळ मध्ये हिशेबात जुळवाजुळव करण्यासाठी चुकीच्या नोंदी करून 1 लाख 78 हजार असा एकूण 3 लाख 52 हजार रुपयांची अफरातफर केली. 

प्रथमेश पॉलीमधून तीन लाख 
जिल्हापेठ परिसरातील विष्णू विहारमधील प्रथमेश पॉली या प्रतिष्ठानातून रोज मेळ मध्ये रक्कम जास्त लिहिली. मात्र प्रत्यक्षात बॅंकेत रक्कम कमी भरली. त्यात 2 एप्रिल 2016 ते 22ऑगस्ट 2016 दरम्यान 2 लाख 90 हजार रुपये तोष्णीवाल याने लंपास केल्याचे मणियार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

प्रथमेश प्लास्टिकमध्ये 95 हजारांवर डल्ला 
एमआयडीसीतील प्रथमेश प्लास्टिक या फर्ममधून तोष्णीवाल याने रोज मेळ मध्ये रक्कम लिहिली. मात्र प्रत्यक्षात ती बॅंकेत जमाच केली नाही. अशा पद्धतीने 28 जुलै 2016 ते 3 सप्टेंबर 2016 दरम्यान 95 हजारांवर डल्ला मारला आहे. अशा तीनही फर्ममध्ये एकूण 7 लाख 37 हजार रुपये तोष्णीवाल याने हडप केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले तपास करीत आहेत. 

Web Title: fraud seven million