नाशिकमध्ये 1 जानेवारीला मोफत महाआरोग्य शिबिर

नाशिकमध्ये 1 जानेवारीला मोफत महाआरोग्य शिबिर

नाशिक - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नाशिकमधील गोल्फ क्‍लब मैदानावर 1 जानेवारी 2017 ला मोफत महाआरोग्य शिबिर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी दहाला उद्‌घाटन होईल. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहतील.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की 25 ते 31 डिसेंबरदरम्यना अटल आरोग्य सप्ताह होत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक वैद्यकीय तपासणी मोहीम राबवण्यात येईल. शिवाय शहरातील प्रभागांत वैद्यकीय तपासणी केली जाईल. मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया करावयाच्या रुग्णांवर नाशिकमधील 30 रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून 1 ते 31 जानेवारी 2017 या कालावधीत विनामूल्य शस्त्रक्रिया केल्या जातील. त्यासाठी रुग्णालयांना 971 आजारांच्या उपचारासाठी सरकारची "स्पेशल पोर्टल'ची मान्यता देण्यात येईल. इतर मोठ्या शस्त्रक्रिया मुंबईत होतील.

हे आरोग्य शिबिर आतापर्यंत 14 जिल्ह्यांत घेण्यात आले. जळगावमध्ये 80 हजार, बीडमध्ये एक लाख 15 हजार रुग्णांवर इलाज करण्यात आले आहेत.

तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सहभाग
नाशिकमधील महाआरोग्य शिबिरात सहभागी होणारे तज्ज्ञ डॉक्‍टर असे ः पद्मश्री अमित महादेव, तात्याराव लहाने, रतन देशपांडे, पद्मविभूषण कांतिलाल संचेती, सुलतान प्रधान, हृदयरोगतज्ज्ञ रमाकांत पांडा, रणजित जगताप, मेंदुविकारतज्ज्ञ देवपुजारी, अस्थिरोगतज्ज्ञ शेखर भोजराज, शरद हार्डिकर, अजय चंदनवाले, शैलेश पुणतांबेकर, कैलास शर्मा, जयश्री तोडकर. नेत्र, हृदय, मेंदुरोग, बालरोग, मूत्ररोग, त्वचारोग, स्त्रीरोग, मनोविकार, श्‍वसनविकार, ग्रंथीचे विकार, कर्करोग अशा आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. स्तनाचा कर्करोग, लठ्ठपणा तपासणी, रक्तदान, अवयवदान नोंदणी कक्ष असेल. प्रथमच आयुर्वेद, जिनेटिक निदानाची सुविधा उपलब्ध असेल.

सरकारी वैद्यकीय महाविद्यालय
नाशिकमधील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण महाविद्यालयासह जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोचला आहे. याशिवाय आयुर्वेद प्रवेशाला 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सांगून श्री. महाजन म्हणाले, की वैद्यकीय महाविद्यालयांत संशोधनाला चालना मिळावी, यासाठीचा निर्णय लवकरच घेतला जाईल. त्या संदर्भात आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. एवढेच नव्हे, तर आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या भरवशावर अवलंबून न राहता आरोग्य सेवेंतर्गत पदोन्नती देण्याचा निर्णय लवकर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com