पंढरपूरसाठी भाविकांना मोफत रेल्वे - रक्षा खडसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

जळगाव - आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन व्हावे, यासाठी भुसावळ येथून 14 जुलैला मोफत रेल्वे सोडण्यात येणार आहे. यात कोणतेही पक्षाचे बंधन नाही. सर्व जनतेसाठी ही सेवा असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

त्या म्हणाल्या, की जिल्ह्यातील भाविकांना आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्याकरिता यावर्षीही रेल्वेची मोफत सुविधा उपलब्ध केलेली आहे. 14 जुलैला सकाळी साडेआठला भुसावळहून ही रेल्वे निघेल. तिला अठरा डबे असतील. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे या गाडीला थांबा असेल. त्यानंतर मात्र गाडी थेट पंढरपूरला जाईल. 15 जुलैला दिवसभर दर्शन करून रात्री 11 वाजता गाडी पंढरपूरहून जळगावकडे येण्याकरिता निघेल. प्रवाशांची भोजनव्यवस्था गाडीतच असेल. यात कोणतेही पक्षीय बंधन नाही. नियोजनासाठी भाविकांनी भाजपच्या तालुकाध्यक्षांकडे आपली नावे द्यावीत.

चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात
महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात खासदार खडसे म्हणाल्या, की चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. तरसोद ते फागणे (जि. धुळे) या टप्प्यातील कामाची निविदा 7 जुलैला, तर चिखली ते तरसोद टप्प्याची निविदा 11 जुलैला काढण्यात येणार आहेत.

Web Title: Free train devotees to Pandharpur - Raksha Khadse