एकाच ताटात जेवणाऱ्या मित्रानेच केला घात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

धावत्या रेल्वेत अनधिकृत विक्रेत्यांची साखळी निर्माण करणे, भुरट्या चोरांना पोसण्यासह तृतीयपंथीयांच्या कमाईवर जळगाव, भुसावळ शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या पोसल्या जात आहेत.

जळगाव -  धावत्या रेल्वेत अनधिकृत विक्रेत्यांची साखळी निर्माण करणे, भुरट्या चोरांना पोसण्यासह तृतीयपंथीयांच्या कमाईवर जळगाव, भुसावळ शहरात गुन्हेगारांच्या टोळ्या पोसल्या जात आहेत. रेल्वेतील चोऱ्या आणि गुन्हेगारी घटनांची माहिती पोलिसांना देतो म्हणून शनिवारी भुसावळमध्ये मयूर ऊर्फ विक्की अलोने व खुशाल बोरसे यांचा जखमी खलिलसोबत वाद होऊन त्यातून गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जखमी शाहरुख ऊर्फ खलिल याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. 

रेल्वेत वेंडर म्हणून धंदा करण्यासाठी अमूक एक टोळीचा सदस्य झाल्याशिवाय तो काम करू शकत नाही. तर वेगवेगळ्या टोळ्यांचे तृतीयपंथीही रेल्वेत टाळ्या टिपून भिक्षेच्या नावावर जबरी वसुली करतात. त्यांनतर ठरलेली रक्कम या टोळीला द्यावी लागते, अशाच एका वादातून चार वर्षांपूर्वी शकील शेख (वय २५) याचा प्रजापतनगर येथे डोळ्यांत मिरचीपूड फेकून खून करण्यात आला होता. रेल्वेतील पाकिटमार, मोबाईलचोर, लोखंड चोरणारे, चाकू लावून प्रवाशांना लुटणारे असोत की, विक्रेते अशा कुणालाही पोलिसांव्यतिरीक्त अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कसारा आणि सुरत लाइनवर जळगाव-भुसावळसह सुरती टोळीचा आसरा घ्यावाच लागतो. त्याशिवाय फलाटावर फिरकू सुद्धा दिले जात नाही. विरोध किंवा सोबत राहून गद्दारी करणाऱ्याला वेळप्रसंगी आपल्या जिवाला मुकावे लागते, इथपर्यंत या टोळीची दहशत रेल्वेरुळांवर चालते. अशाच एका ‘मॅटर’मध्ये खलिल ऊर्फ शाहरुखसोबत खुशाल उर्फ भुऱ्या गजानन बोरसे याची ‘टस्सल’ सुरू होती. मात्र, खलिल हा विक्की ऊर्फ अमोलचा मित्र असल्याने प्रकरण शांत होते. काल रात्री खलिल भुसावळला गेला असताना तिघांनी खडकारोड येथील एका हॉटेलवर यथेच्छ बियर प्राशन केली. बिअरच्या झिंगमध्येच मयूर आणि खलिल यांच्यात वादाला सुरवात झाली. खलिलने चॉपर काढत मयूरवर वार केले. मात्र, तो बचावला. त्याने स्वत:च्या कंबरेतून रिव्हॉल्व्हर काढून ती विक्कीच्या हातात दिली. नंतर गोळीबाराची घटना घडली.

एका ताटात जेवणारे मित्र 
शाहरुख ऊर्फ खलिल आणि विक्की ऊर्फ अमोल दोघेही घनिष्ठ मित्र होते. सोबत राहून रेल्वेतील प्रत्येक ‘प्रकरण’ आपसांत सोडवत होते. मात्र, खलिल आपल्यासोबत असताना खुशालवर हल्ला करून त्याला मारून टाकेल, या भीतीने विक्कीने तीन वेळा हवेत गोळीबार केला, तरी सुद्धा खलिलचे वार थांबत नसल्याने त्याच्या दिशेने चार गोळ्या मारल्यावर त्यापैकी एक त्यांच्या खांद्याला लागली. छातीवर गोळी लागली असती तर कदाचित खलिलचा मित्राच्या हातूनच खून झाला असता असेही त्यांना ओळखणाऱ्यांनी सांगितले.

विक्की कोर्टाचा शिपाई
जिल्हा ग्राहक मंचात अमोल ऊर्फ विक्की दीपक अलोने हा कंत्राटी पद्धतीने शिपाई पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. डिप्लोमापर्यंतचे विक्कीचे शिक्षण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friend shot his friend