बेकायदा भूखंड, प्लॅटची विक्री प्रकरणी भूमिअभिलेख अधिकाऱ्यांसह १३ जणांवर गुन्हा दाखल 

बेकायदा भूखंड, प्लॅटची विक्री प्रकरणी भूमिअभिलेख अधिकाऱ्यांसह १३ जणांवर गुन्हा दाखल 

शिरपूर : विकसन करारनामा व कायमस्वरूपी मुखत्यारपत्र केलेला भूखंड आणि सदनिकेची कागदपत्रांमध्ये बेकायदेशीर फेरफार करून विक्री केल्याच्या संशयावरून भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांसह १३ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचा संशयितांत समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

धर्मेश दीपक शहा (वय ४४, रा. गुलटेकडी, पुणे) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ते व त्यांची आई सुनीता शहा यांची भागीदारीत शहा कन्स्ट्रक्शन ही फर्म आहे. या फर्मतर्फे उभयतांनी २००३ मध्ये शहरातील वरवाडे येथील सिटी सर्व्हे क्रमांक ३५०७ व ३५०३ या भूखंडाचा विकसन करारनामा व कायमस्वरूपी मुखत्यारपत्र ४६ लाख ३१ हजार ५०० रुपयांच्या मोबदल्यात हेमलता भूपेंद्रकुमार शहा यांच्याकडून घेतले. या भूखंडावर शहा कन्स्ट्रक्शनतर्फे भाविका कॉम्प्लेक्स नामक व्यापारी व निवासी संकुल उभारले असून तेथील सदनिकांची विविध व्यक्तींना विक्री केली. उर्वरित भूखंडाचे भाग करून त्यांचीही विक्री करण्यात आली. 

रस्त्यावर पत्रे आणि गाजावाजा 
या परिसरात हॉस्पिटल असलेले डॉ. सुरेश पाटील यांना नोव्हेंबरमध्ये कॉम्प्लेक्सच्या रहदारीच्या रस्त्यावर पत्रे ठोकून शेड तयार केल्याचे आढळले. त्यांनी चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ती जागा हेमलता शहा यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. ही बाब डॉ. पाटील यांनी धर्मेश शहा यांना कळवली. त्यामुळे शहा यांनी शिरपूरला येऊन खातरजमा केली असता हेमलता शहा यांनी ऑक्टोबरमध्ये जागा विक्रीचा बेकायदेशीर विक्री व्यवहार केल्याचे दिसून आले. त्यासोबतच भाविका कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिका व अन्य एका भूखंडाचीही अवैध विक्री केल्याचे आढळले. संशयितांनी मूळ कागदपत्रांमध्ये खाडाखोड व फेरफार करून खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे शहा यांनी नमूद केले आहे. 

धर्मेश शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हेमलता शहा, भूपेंद्र अमृतलाल शहा (दोघे रा.जैन गल्ली, शिरपूर), राहुल शालिक देवरे, रूपेश अर्जुन माळी, भटू भिवसन माळी, गिरीश विजय पाटील (सर्व रा.वरवाडे), भूषण नंदलाल चौधरी (रा. अमळनेर, जि.जळगाव), सुनील देविदास माळी (रा.वाघाडी, ता.शिरपूर), मानसी राकेश अग्रवाल, राकेश अशोक अग्रवाल (दोघे रा.सराफ बाजार, शिरपूर), लाखन मख्खन भिल (रा.रामसिंह नगर, शिरपूर), आनंदा जगन्नाथ कोळी (रा.कुंभारटेक, शिरपूर) यांच्यासह तत्कालीन भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. 

गुन्ह्यांची मालिका 
शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंड आणि सदनिकांच्या मूळ कागदपत्रांत बदल करून त्यांची परस्पर विक्री केल्याचे प्रकार एकापाठोपाठ उघडकीस येत आहेत. यासोबतच बनावट आदेश जोडून जागा बिनशेती करून घेतल्याचे गुन्हेही घडले आहेत. अशा प्रकरणांमध्ये भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांसह प्रतिष्ठित म्हणवल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com