फळे, किराणा, कटलरी, भेळभत्ता विक्रेत्यांचे एकाच ठिकाणी स्वतंत्रपणे हब!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

पार्किंगसह 140 छोट्या व्यावसायिकांसाठी दुकानांना जागा देण्यात आली आहे. तसेच फळे, किराणा, कटलरी, भेळभत्ता विक्रेत्यांचे एकाच ठिकाणी स्वतंत्रपणे हब केले जाणार असून व्यावसायिकांना अधिकृत ओळ्खपत्रही दिले जाणार आहे.
 

येवला - कोण कुठे तर कोण कुठे दुकाने थाटून बसल्याने बेसिस्त झालेल्या येथील टपऱ्या, दुकानांना शिस्त लावण्यासह वाहतुकीला अडथला ठरणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी हाती घेतलेली मोहीम मुख्याधिकारी संगीता नांदूरकर व कर्मचाऱ्यांनी आज सुट्टीच्या दिवशीही राबवली. वर्दळीच्या शनीपटांगणावर पार्किंगसह 140 छोट्या व्यावसायिकांसाठी दुकानांना जागा देण्यात आली आहे. तसेच फळे, किराणा, कटलरी, भेळभत्ता विक्रेत्यांचे एकाच ठिकाणी स्वतंत्रपणे हब केले जाणार असून व्यावसायिकांना अधिकृत ओळ्खपत्रही दिले जाणार आहे.

आज सकाळपासूनच नांदुरकरानी शनीपटांगणाला टार्गेट करून तेथे पट्टे आखण्यास सुरुवात केली होती. येथे 5 बाय 7 च्या जागेत एका व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी जागा देण्यात येणार आहे.येथे एका रांगेत 14 असे दहा रांगांमध्ये रेडिमेड कापड विक्रेते, कटलरी, स्टेशनरी, पान विक्रेते, चौरंग पाट विक्रेत्यांना क्रमवारीनुसार चिठ्ठया टाकून 140 दुकानांना जागा वाटप केली तर यांना पालिका परवानगी देणार आहे. शनिवारी सायंकाळी चिट्ठी पद्धतीने सोडत काढून व्यावसायिकांना जागा देण्यात आल्या.या ठिकाणी चारचाकी वाहनांना पार्किंगची व्यवस्था कऱण्यात आली असून शनी मंदिरासमोर दुचाकी वाहनांना पार्किंगची व्यवस्था असेल. इंद्रनील कॉर्नरच्या पाठीमागे सुद्धा वाहनांना पार्किंग व्यवस्था पालिकेने शहरवासीयांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

तसेच राज्य महामार्गावर वडापाव, चहा विक्रेत्यांना महामार्ग सोडून विंचूर चौफुलीजवळील मारुती मंदिराच्या पाठीमागे एकाच ठिकाणी जागा देण्यात आली आहे. इंद्रनील कॉर्नर समोर भेळभत्ता  दुकानांना जागा देण्यात आली आहे. ज्यांना जेथे जागा दिली तेथेच बसावे लागणार असून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे मुख्याधिकारी नांदूरकर यांनी सांगितले.इंद्रनील कॉर्नरसमोरील काम सुरु असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील जागेत एकाच ठिकाणी चिकन, मटणाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. भेळभत्ता व चिकन दुकानांना शुक्रवारीच जागा आखून त्याचे स्वतंत्र हब करण्यात आले आहे. यामुळे अस्तव्यस्तपणे बसणारे व्यावसायिक आता एकच ठिकाणी बसलेले दिसणार आहेत.

शनी पटांगणावर फळ विक्रेते, किराणा ,कटलरी,यांचे वेगवेगळे हब असणार आहेत. चारचाकी व दुचाकी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याने माधवराव शिंदे पाटील संकुलाच्या आवारानेही मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले आहे.भाजीपाला विक्रेत्याना केशवराव पटेल मार्केटच्या इमारतीत हलविल्याने पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर भाजीपाल्याची इमारत भरून निघाली आहे.शनी पटांगणावर शुक्रवारी रात्रीपासूनच छोट्या दुकानांना जागा देण्यासाठी पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर या पालिका अधिकारी व कर्मचार्यांसह जागा आखणीसाठी हजर होत्या. या पटांगणावर व्यवसाय करणारे व शहरवासीय शनिवारी सकाळीही आखणीचे काम सुरू असताना तळ ठोकून होते. अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर प्रथमच अधिकृत जागा व ओळ्खपत्रही मिळणार आले.

“वाहतूक व व्यवसायांना शिस्त लावण्यासाठी हि मोहीम राबवली आहे.नागरिकाची अडचण दूर होणे हि यामागची भूमिका आहे. व्यवसाय करण्यासाठी पालिकेने जागा दिली असली तरी त्या जागेत कुठलीही टपरी वा शेड उभारता येणार नाही. सकाळी चारचाकी हातगाडीवर साहीत्य आणून रात्री पुन्हा ही जागा मोकळी करावी लागणार आहे.जागा दिली म्हणजे मालकीची होणार नाही. पालिकेचे नियम न पाळणाऱ्यांकडून जागा काढली जाईल.” - संगीता नांदूरकर, मुख्याधिकारी, येवला

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Fruits grocery cutlery and baker sellers hub in one place