
Nandurbar News : 1 कोटी 10 लाखांचा निधी वाया..!
Nandurbar News : शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी, नागरिकांना करमणुकीसाठी नवापूर पालिका हद्दीत मरीमाता मंदिर परिसर पर्यटन विकासअंतर्गत २०११ मध्ये एक कोटी दहा लाखांच्या निधीतून बांधकाम झाले खरे मात्र त्याचा उपयोग अद्याप नागरिकांना होऊ शकला नाही.लोकार्पणापूर्वीच करमणूक केंद्राचे खंडारात रूपांतर झाले.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांना लोकशाही दिनात कामे पूर्ण झाल्याचे व नगर परिषदेकडे हस्तांतर झाल्याचे खोटे कागदपत्र दाखवून जिल्हाधिकारी आणि तक्रारदार यांची दिशाभूल केली आहे. (Fund of one crore and ten lakhs wasted Navapura recreation centre converted into ruins before public dedication Nandurbar news)
नवापूर पालिका हद्दीतील मरीमाता मंदिर परिसर पर्यटन विकासअंतर्गत २०११ मध्ये करमणूक केंद्र, जलक्रीडा, सभागृह, चौपाटी तयार करून, परिसरात फलोत्पादन करणे, आजूबाजूने संरक्षण भिंत बांधण्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता.
बांधकाम झाले मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या कोट्यवधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. लोखंडी गेट, लाकडी चौकट, दरवाजे, खिडक्या चोरीला गेल्याने सर्व खंडार झाले आहे.
तत्कालीन पर्यटन व विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि आमदार शरद गावित यांच्या प्रयत्नाने एक कोटी १० लाखांचा निधी उपलब्ध झाला होता.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प पूर्ण न करता अपूर्णावस्थेत सोडल्याने स्थानिक नागरिकांनी २०१३ पासून २०२३ आजतागायत या दहा वर्षांत तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालय, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालयात याबाबत तक्रारी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईसाठी नियमित पाठपुरावा सुरू होता.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदारांना लोकशाही दिनात कामे पूर्ण झाल्याचे व नगर परिषदेकडे हस्तांतर झाल्याचे खोटे कागदपत्र दाखवून जिल्हाधिकारी आणि तक्रारदार यांची दिशाभूल केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
संबंधित अधिकाऱ्यांनी एक कोटी १० लाखांच्या मालमत्तेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज या प्रकल्पाची दयनीय अवस्था झाली आहे. लोखंडी सळ्या, लाकडी चौकट, दरवाजे, खिडक्या, लोखंडी गेट इत्यादी लाखो रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास येते.
मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाच्या कोट्यवधी रुपये निधीचा अपव्यय झालेला असल्याने स्थानिक तक्रारदार मंगेश येवले यांनी संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.