स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामगिरीवर मिळेल निधी - डॉ. उदय टेकाळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

धुळे - स्वच्छ सर्वेक्षण-२०१७ मध्ये शहराची कामगिरी कशी आहे, यावर शासनाचा निधी अवलंबून असेल. त्यामुळे जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. शहर हागणदारी मुक्तीसाठी सार्वजनिक शौचालयांपेक्षा वैयक्तिक शौचालये उभी करा, असा सल्ला स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य अभियान संचालक डॉ. उदय टेकाळे यांनी दिला.

धुळे - स्वच्छ सर्वेक्षण-२०१७ मध्ये शहराची कामगिरी कशी आहे, यावर शासनाचा निधी अवलंबून असेल. त्यामुळे जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. शहर हागणदारी मुक्तीसाठी सार्वजनिक शौचालयांपेक्षा वैयक्तिक शौचालये उभी करा, असा सल्ला स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य अभियान संचालक डॉ. उदय टेकाळे यांनी दिला.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) विविध विषयांचा आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी राज्य अभियान संचालनालयाचे पथक आज धुळ्यात आले होते. या पथकाने सायंकाळी साडेपाचला महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. टेकाळे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (आरसीयूईएस) संचालिका उत्कर्षा कवडी, उपसंचालक विजय कुलकर्णी, राज्य अभियान संचालनालयाचे विशेष कार्य अधिकारी विजय सनेर, ‘जीआयझेड’चे तांत्रिक सल्लागार जितेंद्र यादव, सी. एम. फेलो स्वच्छ महाराष्ट्रचे अभिजित अवारी, आयुक्त संगीता धायगुडे, उपमहापौर उमेर अन्सारी, माजी महापौर जयश्री अहिरराव, विरोधी पक्षनेते गंगाधर माळी आदी उपस्थित होते. 

डॉ. टेकाळे म्हणाले, की स्वच्छ सर्वेक्षणातील गुणानुक्रम व निधी याची सांगड घातली जाणार आहे. त्यामुळे जेवढी कामगिरी चांगली त्या प्रमाणात महापालिकेला निधी मिळणार आहे.

वैयक्तिक शौचालयांना महत्त्व द्या
सार्वजनिक शौचालयांची देखभाल-दुरुस्ती हे जिकिरीचे काम असते. तक्रारी मोठ्या प्रमाणावर असतात. खर्च करूनही अधिकारी, पदाधिकारी बदनाम होतात. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांपेक्षा वैयक्तिक शौचालयांचा वापर कसा वाढेल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे डॉ. टेकाळे म्हणाले. राज्य व केंद्रीय समिती नागरिकांना थेट प्रश्‍न विचारेल. या प्रश्‍नांची उत्तरे नागरिकांकडून नकारात्मक आली तर त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित माहिती संकलित करावी, माहिती इंग्रजीतून ठेवावी, नोडल ऑफिसर नेमावा अशा काही सूचनाही डॉ. टेकाळे यांनी केल्या.

शाश्‍वत काम उभे करा
२६ जानेवारीपर्यंत हागणदारीमुक्त शहर करायचे म्हणूनच केवळ प्रयत्न नकोत, तर हागणदारी मुक्तीच्या दृष्टीने शाश्‍वत काम उभे राहील असा प्रयत्न करा, असे मत श्रीमती कवडी यांनी मांडले. सार्वजनिक शौचालयांच्या भानगडीत न पडता वैयक्तिक शौचालयांना महत्त्व देण्याची गरज त्यांनीही व्यक्त केली. हागणदारी मुक्तीसाठी आतापर्यंतचे काम वाखाणण्याजोगे असल्याचेही त्या म्हणाल्या. आयुक्त धायगुडे यांनी शौचालयांच्या कामांना गती देण्यासाठी अधिक निधीची गरज असल्याचे सांगितले. सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, ओव्हरसियर पी. डी. चव्हाण, अनिल साळुंके यांनी कामाचा आढावा मांडला. मॉडेल प्रभाग १३ बद्दल शिव फाउंडेशनचे अमित खंडेलवाल यांनी माहिती दिली. ‘सकाळ’च्या तनिष्का सदस्याही कार्यशाळेला उपस्थित होत्या.

पथकाकडून पाहणी
कार्यशाळेनंतर पथकाने सायंकाळी उशिरा शहरातील हागणदारीमुक्त भाग व वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली. यात पांझरा नदीकाठचा परिसर, संतोषीमाता मंदिर परिसर, प्रभाग १३, पारोळा रोड, बारापत्थर आदी भागांत जाऊन पाहणी केली. शिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बांधलेल्या काही वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली.

नगरसेवकांची पाठ
बोटावर मोजण्याइतके नगरसेवक सोडले तर इतर नगरसेवकांनी कार्यशाळेकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही नगरसेवक कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यानेही निघून गेले.

Web Title: Funding will survey the performance of the clean