जलयुक्त शिवार अभियानात गडखांब गावाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

राज्य शासनाच्या महत्वाकांशी जलयुक्त शिवार अभियानात गडखांब (ता. अमळनेर) गावाचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी दूर करण्यासाठी नुकतीच शिवारफेरी काढून कामांचे नियोजन करण्यात आले.

अमळनेर - राज्य शासनाच्या महत्वाकांशी जलयुक्त शिवार अभियानात गडखांब (ता. अमळनेर) गावाचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरुपी दूर करण्यासाठी नुकतीच शिवारफेरी काढून कामांचे नियोजन करण्यात आले. नाला खोलीकरण, जुन्या कामांची दुरुस्ती, बांधबदिस्त आदींचा समावेश आहे. कृषी विभाग, पाटबंधारे यासह विविध विभागांमार्फत कामे केली जाणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट गावांचा कृती आराखडा तयार करण्यासाठी शिवारफेरी काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गडखांब गावात पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागूल, उपसरपंच मधुकर पाटील, कृषी सहायक कविता बोरसे, ग्रामसेवक जी. एम. पवार व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच शिवारफेरी काढण्यात आली. जलसंधारणासाठी परिसरात दोन गटात बांध बंदिस्त, नाल्यांवर बंधारे, जुन्या कामांची दुरुस्ती, जलसाठ्यात वाढ करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले. कामांचे मोजमाप करून ती कामे कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आली. त्यास ग्रामसभेचीही मंजूरी घेऊन वरिष्ठस्तरावर ते प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून गडखांब परिसरात दुष्काळाच्या सावटामुळे शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गावाचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करावा, अशी मागणी सातत्याने होत होती. गावाचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेततळ्यांचे काम पूर्ण
शेती पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी शेततळ्यांमधील पाणी उपयोगी पडत असल्याने शेतकऱ्यांना शेततळयांचे महत्व पटले आहे. यामुळे नगाव व गडखांब मिळून  शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यात तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यहस्ते या शेततळ्यांची पाहणी व कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर  शेततळ्यांसाठी अर्ज प्रस्तावित आहेत.

Web Title: Gadgamb village included in Jalyukt Shiva scheme