
Dhule Crime News: LCB पथकावर जुगारींचा हल्ला; 5 पोलिस जखमी
धुळे : कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलिस कर्मचारी पथकावर जुगारींनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. १९) रात्री वरखेडे (ता. धुळे) येथे घडली.
या हल्ल्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. नंतर पोलिसांनी रात्रीतूनच हल्लेखोरांची धरपकड सुरु केली. पोलिसांनी आतापर्यंत १९ संशयितांना अटक केली आहे. संशयित चौघे फरार आहेत. त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
वरखेडे (ता. धुळे) गावात श्री बहिरम महाराज यात्रोत्सव सुरू आहे. ग्रामीण भागात यात्रेनिमित्त जुगारींचा वेगळाच उत्सव असतो. वरखेडेत बहिरम महाराज मंदिरापासून जवळच एका घरामागे पत्त्याचा डाव रंगला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार एलसीबीचे पथक कारवाईसाठी रविवारी (ता. १९) रात्री नऊच्या सुमारास वरखेडे येथे धडकले. ज्या ठिकाणी झन्ना मन्ना जुगाराचा डाव रंगला, तेथे पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. मात्र, डाव रंगलेला असताना पोलिस आल्याने जुगारी संतप्त झाले. त्यांनी एलसीबीच्या पथकावरच हल्ला केला. एलसीबीच्या पोलिसांना मारहाण केली.
अनपेक्षित झालेल्या या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली. जुगारींनी केलेल्या हल्ल्यात एलसीबीचे योगेश ठाकूर, मयूर पाटील, तुषार पारधी, जगदीश सूर्यवंशी व योगेश साळवे, असे पाच कर्मचारी जखमी झाले. मारहाणीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी योगेश ठाकूर यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार संशयित विलास राजेंद्र मराठे, लक्ष्मण लोटन पाटील, सुधीर दिगंबर धनगर, विपुल राजेंद्र पाटील, राकेश लोटन पवार, नितीन ऊर्फ सोनू शिवाजी पवार, जयेश अनिल पाटील, नंदू युवराज पाटील, अविनाश शंकर घुमटकर, सागर अरुण पाटील, कैलास प्रदीप पाटील, दिलीप लोटन शिंदे, मयूर अरुण भदाणे, राकेश कैलास पाटील, सागर एकनाथ पाटील, पंडित सुखदेव पाटील, मच्छिंद्र नवनीत मराठे, वाल्मीक भीमराव पाटील, अमोल ऊर्फ गोपाल निवृत्ती चव्हाण, संदीप ऊर्फ पप्पू राजेंद्र पाटील, रोहित ऊर्फ मोन्या सत्यजित पटेल, विक्की बाबू घुमटकर, शिवाजी यशवंत माळी (सर्व रा. वरखेडे, ता. धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.