जुगाराची उसनवारी..आणि मैत्रीत घात...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

रामेश्‍वर २० सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर ३० ऑक्‍टोबरला इंदिरानगर पोलिस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दाखल केली होती. सोमवारी मृतदेह सापडल्यानंतर पोलिस चक्रावून गेले. ओळख पटविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. मात्र पोलीसांनी चौकशीला सुरवात केली. त्यात हा मुलगा कदाचित बेपत्ता असलेला रामेश्‍वर असू शकतो, अशी शंका त्यांना आली. त्यामुळे त्यांनी त्याचा भाऊ विकास याला बोलावले. विकासने पॅन्ट आणि कंबरेला असलेल्या बेल्ट ओळखत हा मृतदेह त्याचा लहान भाऊ रामेश्‍वरचाच असल्याचे ओळखले.

नाशिक : पेठेनगरमधील पडीक विहिरीत सोमवारी (ता. ११) आढळलेल्या शिर आणि हात नसलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, तो राजीवनगर वसाहतीमधील रामेश्‍वर कावले (वय १६) या मुलाचा आहे. त्याच्या खुनाच्या संशयावरून पोलिसांनी याच वसाहतीमधील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. उधारीत खेळण्यात आलेल्या जुगारातील पैशांच्या देवाणघेवाणीवरूनच हा खून झाल्याची माहिती समोर आली. 

तीन अल्पवयीन मुलांनी मृतदेह फेकला विहिरीत 
पोलिसांच्या माहितीनुसार रामेश्‍वर २० सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर ३० ऑक्‍टोबरला इंदिरानगर पोलिस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दाखल केली होती. सोमवारी मृतदेह सापडल्यानंतर पोलिस चक्रावून गेले. ओळख पटविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. मात्र उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण आणि निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी तपासाची दिशा नक्की करत चौकशीला सुरवात केली. त्यात हा मुलगा कदाचित बेपत्ता असलेला रामेश्‍वर असू शकतो, अशी शंका त्यांना आली. त्यामुळे त्यांनी त्याचा भाऊ विकास याला बोलावले. विकासने पॅन्ट आणि कंबरेला असलेल्या बेल्ट ओळखत हा मृतदेह त्याचा लहान भाऊ रामेश्‍वरचाच असल्याचे ओळखले. सोबत सर्वांत शेवटी तो वसाहतीमधील तीन मुलांसोबत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अवघ्या बारा तासांत यातील संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी धक्कादायक घटनाक्रम सांगत सर्वांना हादरून सोडले.

Image may contain: one or more people, people standing, plant, outdoor and nature

मृतदेह सापडलेल्या विहिरीतील पाणी पंपाच्या सहाय्याने उपसण्याचे सुरू काम

१७ फूट पाणी उपसून मृतदेह काढला बाहेर

सकाळपासून उपनिरीक्षक जे. जी. शेख, पी. बी. बाकले, एस. जी. जगदाळे, सहाय्यक उपनिरीक्षक डी. पी. पाळदे आणि हादगे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी खासगी पंपांची व्यवस्था करत सायंकाळी उशिरापर्यंत या विहिरीतील सुमारे १७ फूट पाणी उपसण्यात यश मिळविले. वारंवार येणाऱ्या यंत्रसामग्रीच्या अडथळ्याने यात सातत्याने व्यत्यय येत होता. पाणी उपसण्याची प्रक्रिया सतत सुरू ठेवून या प्रकरणाचा संपूर्ण शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. 

असा केला घात
रामेश्‍वर यातील एका मुलाबरोबर सातत्याने उधारीमध्ये जुगार खेळत असे. याचद्वारे त्याचे या मुलाकडे दीड लाख रुपये येणे झाले होते. त्यावरून तो त्याला दारू पिऊन सतत शिवीगाळ करीत असे. २० सप्टेंबरला रामेश्‍वरने तिघांना आपल्याला चोरी करायला जायचे आहे, असे सांगत बाहेर नेले. मात्र तशी संधी न मिळाल्याने ते रात्री दीडच्या सुमारास पडीक जमिनीजवळ आले. मुलाने हीच संधी साधून चोरीसाठी सोबत घेतलेल्या दोरीने त्याचा गळा आवळला. त्याला इतर दोघांनी मदत केली. तो मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याच दोरीला मोठा दगड बांधून हा मृतदेह या विहिरीत टाकून दिला. शरीरापासून वेगळे झालेले शिर आणि हात याच विहिरीत असतील याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी या विहिरीतील पाणी उपसण्याचा निर्णय घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gambling murders Friendship fraud Crime News Nashik