सटाणा ते चौगाव रस्त्यावर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची गांधीगिरी

satana
satana

सटाणा : सटाणा ते चौगाव या शहरहद्दीतील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मंगळवार (ता.३) रोजी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गांधीगिरी पद्धतीने वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

येत्या आठ दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता रहदारीयोग्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिला आहे. 

आज सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी यासटाणा - चौगाव रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन छेडले. यानंतर बागलाणच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, शहरातील चार फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चौगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोठ - मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या खासगी जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून जलवाहिनीस गळती लागल्यास खड्ड्यांमध्ये पाणी जमा होते.

रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याने डांबरीकरण उखडले झाले असून रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत असते. चौगावकडून शेकडो शेतकरी आपला शेतमाल वाहनांद्वारे सटाणा बाजार समितीमध्ये याच रस्त्याने आणतात. मात्र खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शहरहद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावर दीपनगर, भिवसननगर, गणपत नगर या नववसाहतीमधील नागरिकांची दररोज मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. 

जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्याचे काम असल्याने हे खड्डे भरून घेण्याची नैतिक जबाबदारी संबंधित खात्याची असून त्यांनी ठेकेदाराला वेठीस धरून त्यांच्याकडून खड्डे भरून घ्यावेत अथवा बांधकाम विभागाच्या निधीतून ते काम पूर्ण करावेत. अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. प्रशासनाने त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने रस्ते रहदारीयोग्य राहिलेले नाही.

लवकरच यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. आंदोलनात माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, केशव मांडवडे, बाजार समितीचे माजी सभापती भिका सोनवणे, झिप्रू सोनवणे, रत्नाकर सोनवणे, भास्कर सोनवणे, देवेंद्र सोनवणे, राजेंद्र सोनवणे, केशव सोनवणे, भिकन शाह, रवींद्र सोनवणे, प्रवीण अहिरे, नंदकिशोर सोनवणे, राजेंद्र कापडे, विश्वास जोशी, आरिफ शहा, भरत अहिरे, संदीप बधान आदींसह नागरिक व वाहनधारक सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com