सुटी असल्याने भाविकांची अलोट गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

जळगाव  - गणेशोत्सवाला सुरू होऊन नऊ दिवस झालेही अन्‌ उत्सव आता अंतिम चरणात आला आहे. अंतिम चरणातील या उत्सवात रंगतही आता वाढली आहे. सायंकाळी दिव्यांच्या रोषणाईमुळे प्रमुख चौकांतील परिसर झगमगत असून, आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप येत आहे. वाहन आणि भाविकांची होणारी गर्दी यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव सध्या येऊ लागला आहे. 

गणरायाचे आगमन झाल्यानंतर दोन दिवस काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या आरास पूर्ण करण्यात गेले. त्यातच पावसानेही हजेरी लागल्याने मंडळांचे कार्यकर्ते आणि भाविकांचीदेखील तारांबळ उडाली होती. त्यामुळे सुरवातीला काहीसा निरुत्साह होता. मात्र, दोन दिवसांपासून गणेशोत्सवातील रंगत वाढू लागली आहे. काही लहान गणेश मंडळांसह घरगुती गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन केल्यानंतर भाविक आरास पाहण्यासाठी घराबाहेर पडू लागले. शहरात विशेषतः महापालिका, गोलाणी व्यापारी संकुल, स्टेशन रोड व नविपेठ, सुभाष चौक, सराफ गल्ली परिसरात गणेशोत्सवाचे उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच महापालिका कर्मचारी मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या मानाच्या गणपती सन्मुख "सतरा मजली'वरील आकर्षक रोषणाई भाविकांच्या नजरेत भरणारीच आहे. 

सुटी असल्याने भाविकांची गर्दी 
उत्सवाचे आठ दिवस उलटले आणि अंतिम चरणात आलेल्या उत्सवात भाविकांच्या गर्दीने रंग भरू लागला आहे. विशेष म्हणजे आज शासकीय सुटी असल्याने आरास पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. उपनगरांतून येणारे भाविक वाहने सुरक्षितस्थळी लावून देखावे पाहण्यासाठी जात आहेत. प्रामुख्याने नेहरू चौकापासून भाविक आरास पाहण्याची सुरवात करतात. काही भाविक दुचाकी व चारचाकी वाहने सोबत आणत असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा अनुभव येत आहे. ही समस्या सायंकाळी सातनंतर अधिक अनुभवण्यास येत आहे. आज तर भाविकांची गर्दी अधिक असल्याने मंडळांच्या बाहेर लांब रांगा लागलेल्या पाहण्यास मिळत होत्या. 

भाविकांची गर्दी अन्‌ पोलिस बंदोबस्त 
गणेशोत्सवादरम्यान भाविकांची होणारी गर्दी आणि वाहतूक सुरळीत करणे, तसेच शांततेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात जेथे अधिक प्रमाणात गर्दी होते, अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे सायंकाळनंतर पोलिसांची कसरत होताना दिसत आहे. 

Web Title: ganesh festival 2017 jalgaon ganesh ustav