पैशांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकासह टोळी गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

नाशिक - औरंगाबाद रोडवरील देव मोटर्सच्या कार्यालयात गुरुवारी (ता. 24) रात्री पैशांचा पाऊस पाडण्याचा मांत्रिकाचा डाव आडगाव पोलिसांनी छापा टाकून उधळून लावला. एक मांत्रिक फरारी झाला असून, दुसऱ्या मांत्रिकासह पाच जणांना अटक केली. आर्थिक अडचणींमुळे गंडवले जात असलेल्या महिलेच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांना या घटनेची वेळीच माहिती मिळाल्याने कुमारिका संशयितांच्या कृत्यापासून बचावली.

दरम्यान, संशयितांनी यापूर्वीही असे कृत्य केल्याची शक्‍यता असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. कुमारिका ही तक्रारदार महिलेच्या मावशीची मुलगी आहे. प्रमोद सूर्यवंशी (वय 36, रा. जागृतीनगर, जेल रोड), सुधीर भोसले (34, रा. रोकडोबावाडी), तुषार चौधरी (40, रा. साईबाबानगर, सिडको), संदीप वाकडे (35, रा. भुजबळ फार्म, सप्तशृंगी चौक, सिडको), चंद्रकांत जेजूरकर (48, रा. पाथरवट लेन, शिवाजी चौक, पंचवटी) यांना अटक केली. निखिल नावाचा मांत्रिक घटनास्थळावरून फरारी झाला.

आडगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांना गुरुवारी (ता.24) रात्री औरंगाबाद रोडवरील देव मोटर्सच्या कार्यालयात अघोरी पूजाविधी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आडगाव पोलिसांनी सापळा रचून रात्री संशयित प्रमोद सूर्यवंशी याच्या देव मोटर्स कार्यालयावर छापा टाकला. तेथे सहा संशयित अघोरी पूजा करीत होते. निखिल नावाचा मांत्रिक फरारी झाला असून, उर्वरित सहा जणांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या (रा. नालासोपारा प., जि. पालघर) फिर्यादीवरून जादूटोणाविरोधी कायदा व फसवणुकीप्रकरणी दोघा मांत्रिकांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी कुमारिकेची अट
पीडित महिलेवर दहा लाखांचे कर्ज होते. त्याच विवंचनेतून तिने संशयित प्रमोद सूर्यवंशीला दूरध्वनी केला. त्याने पैशांचा पाऊस पाडणाऱ्या मांत्रिकाची माहिती दिली. मांत्रिक पैशांचा पाऊस पाडून एक कोटी रुपये देईल. त्यासाठी त्यास 60 हजार रुपये द्यावे लागतील आणि पूजाविधीसाठी कुमारिका पाहिजे, असे सांगितले. संशयित सूर्यवंशीकडे महिलेने 30 हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले. कुमारिकेला घेऊन संशयित व महिला औरंगाबाद रोडवरील देवा मोटर्सच्या कार्यालयात आले. तेथे मांत्रिक संदीप वाकडे, निखिल यांनी पूजासाहित्य मांडले होते. पूजा सुरू असतानाच आडगाव पोलिसांनी छापा टाकला.

Web Title: gang with exorcist arrested crime