मुलाचा शोध घेणाऱ्या मातेवर जळगावात सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

जळगाव - भुसावळमधील सामूहिक बलात्काराच्या घटना ताज्या असताना जळगाव शहरातील गणेशनगरात पंचेचाळीसवर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाला. ही घटना काल रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. संबंधित मातेचा चौदावर्षीय मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याचा शोध घेताना तिच्यावर नराधमांनी हे कृत्य केले.

जळगाव - भुसावळमधील सामूहिक बलात्काराच्या घटना ताज्या असताना जळगाव शहरातील गणेशनगरात पंचेचाळीसवर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाला. ही घटना काल रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. संबंधित मातेचा चौदावर्षीय मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याचा शोध घेताना तिच्यावर नराधमांनी हे कृत्य केले.

यासंदर्भात संबंधित महिलेने तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी रात्रीच दोघा संशयितांना ताब्यात घेतले.
कल्पना चौधरी (काल्पनिक नाव) ही पती, धनेश व अंबर या मुलांसमवेत गणेशनगरात राहते. पती मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतात. जोड म्हणून मुलेही त्यांना हातभार लावतात. या महिलेचा चौदावर्षीय मुलगा रात्रीचे साडेअकरा झाल्यानंतरही घरी न परतल्याने तिघेही त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होते. मित्रांसमवेत कट्ट्यावर बसला असावा, या अपेक्षेने कल्पना त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडली.

कामगार आयुक्त कार्यालयानजीकच्या चौकात चार-पाच तरुण रात्री कट्ट्यावर बसलेले होते. त्यांना मुलाची विचारणा करताच यातील दोघांनी तो बागेत (विवेकानंद उद्यान) बसला असल्याचे सांगून आत शोधण्यासाठी आत पाठविले. त्यानंतर या नराधमांनी तिच्यामागे जाऊन अंधारात तिची छेड काढत तोंड दाबून बलात्कार केला.

रात्रीच संशयितांचा तपास
पीडित महिलेने घरी येऊन पतीला घटना सांगून रात्रीच पोलिस ठाणे गाठले. रात्रीच्या ड्युटीला असलेले उपनिरीक्षक गिरधर निकम यांच्यासह भास्कर पाटील, नाना तायडे, भटू नेरकर, अजित पाटील, ललित पाटील या पोलिसांनी तत्काळ संबंधित घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. गुन्हा दाखल झाल्यावर रात्रीच चौकशी करीत संशयित राहुल पारसनाथ उमप (वय23, रा. कंजरवाडा), दीपक सुभाष गायकवाड (वय 27, रा. वरणगाव) यांना ताब्यात घेतले.

पती, मुलांचा तक्रार देण्यास नकार
घटना घडल्यावर पती व मुलांनी बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दर्शविला. मात्र, अशा नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी म्हणून तक्रारीवर ठाम राहत पीडित महिलेने त्यांची समजूत काढत तत्काळ पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ हालचाल करून पुरावे संकलनाच्या दृष्टीने पावले उचलली.

मध्यवर्ती ठिकाणी बलात्काराने खळबळ
शहरातील मध्यवर्ती आणि उच्च मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या विवेकानंदनगरातील उद्यानात बलात्काराची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या उद्यानात सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांची संख्या मोठी असून, या घटनेने उच्चशिक्षित कुटुंबीयांतही भीती व्यक्त होत आहे.

बलात्काराचा पाहुणचार?
कंजरवाड्यातील रहिवासी राहुल उमप याच्या नात्यातील पुतण्याची काल हळद असल्याने घरात नातेवाइकांची गर्दी होती. कार्यक्रम आटोपल्यावर राहुल आणि वरणगाव येथून आलेला पाहुणा मित्र दीपक सुभाष गायकवाड (वय 27) दोघे घराबाहेर पडले. मित्र दीपकला काय पाहुणचार द्यावा, याचे चिंतन करीतच टारगट मुलांच्या कट्ट्यावर (कामगार आयुक्त कार्यालय भिंत) शेरेबाजी करण्यासाठी ते थांबले होते. या दोघांसह इतर चार-पाच जणही येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, मुलींकडे पाहून शेरेबाजी करून आसुरी आनंद घेत होते. त्यातच काही वेळाने पीडित महिला त्यांच्या तावडीत सावजासारखी अडकल्याने दोघांनी बलात्काराचा प्रकार केला.

पोलिसी "गोडबोली'
साध्या वेशातील पोलिस संशयितांचा शोध घेताना कंजरवाड्यात गेले. तपास करताना दोघांच्या वर्णनावरून अंदाजही घेतला. खबऱ्या पेरून ठेवल्यावर काही वेळाने दोघा-तिघा पोलिस परिचितांनी पोलिस ठाणे गाठले. ओळखीचे फौजदार म्हणून पीडितावरच लांछन लावत.. ती, तशीच आहे.. साहेब जाऊ द्या हीच बाब अनुभवाने हेरत, उपनिरीक्षक निकम व भास्कर पाटील यांनी मदतीचे सांगत त्यांचाच पाठलाग केल्यावर दोघे संशयित तावडीत सापडले. पोलिसी प्रसाद दिल्यावर घडल्या प्रकाराची पीडित महिनेने दिलेल्या तक्रारीनुसार हुबेहूब गुन्ह्याचा घटनाक्रम दोघांनी सांगितला.

Web Title: gang rape in jalgav