गंगापूर धरणाला खेकड्यांपासून धोका आहे का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

भौगोलिक स्थितीत फरक
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण मातीचे असल्याने या धरणाच्या स्थितीबाबत दूरध्वनी व पाटबंधारे विभागाच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवरून चर्चा सुरू झाली. त्यात गंगापूर धरणाला खेकड्यांचा धोका नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. कोकणातील भौगोलिक स्थिती व राज्यातील पठारावरच्या भौगोलिक परिस्थितीत मोठा फरक आहे. कोकणात दीडशे ते दोनशे मीटर उंचीची धरणे बांधली जात असल्याने खेकड्यांना वावरण्यासाठी मोठी जागा असते. शिवाय कोकणातील खेकड्यांचे वजन व उंची पठारावरील पाण्यात वाढणाऱ्या खेकड्यांपेक्षा कित्येक पटीने अधिक असते. नाशिकमधील गंगापूर धरण अवघ्या ३६ मीटर उंचीचे आहे. त्यामुळे खेकड्यांना वावरण्यास जागा नाही. त्यामुळे नाशिकचे गंगापूर धरण खेकड्यांच्या धोक्‍यापासून दूर असल्याचा निर्वाळा देण्यात आला.

नाशिक - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर फुटीच्या विविध कारणांचा शोध बाहेर येत आहे. काही कारणे तांत्रिक असली तरी खेकड्यांमुळे धरण फुटल्याच्या कारणाने राज्यभर खेकड्यांना महत्त्व प्राप्त झाले. हा विषय गमतीने घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील मातीच्या धरणांचा पाटबंधारे विभागाकडून आढावा घेतला जात असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणाचीदेखील चौकशी करण्यात आली. ही चौकशी अधिकृत नसली तरी महापालिका व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. त्यात मातीच्या गंगापूर धरणाला खेकड्यांपासून धोका आहे का? यावर अनुभवी अधिकाऱ्यांनी मात्र उंची मर्यादित असल्याने धोका नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

तिवरे (ता. चिपळूण) हे मातीचे धरण पाण्याच्या दबावाने फुटले. यात धरणाच्या खालच्या क्षेत्रातील गावे वाहून अनेकांचा मृत्यू झाला. 

धरण का फुटले याबाबतची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले असले, तरी सोशल मीडियावरून धरणफुटीची अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यात जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे वक्तव्य केल्याने राज्यभरात वादाचा विषय झाला. खेकड्यांमुळे धरण फुटू शकते का? यावर तज्ज्ञांनी सकारात्मक असे उत्तर दिल्याने खेकड्यांच्या दगड कोरण्याच्या ताकदीवर शिक्कामोर्तब झाले. त्याच अनुषंगाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्यातील मातीच्या धरणांचा आढावा घेतला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangapur dam is a Danger from crab