धमकीनंतरही गंगापूर धरणाची सुरक्षा रामभरोसे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

गुप्तचर यंत्रणेच्या पथकानेही धरणाला भेट देऊन पाहणी केली. जलसंपदा विभागाने ग्रामीण पोलिसांकडे वारंवार कायमस्वरुप बंदोबस्ताची मागणी केली असूनही पोलिसांकडून त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविली गेली. 

नाशिक : नाशिकसह नगर, मराठवाड्याला पाण्याची तहान भागविणारे गंगापूर धरण बॉम्ब उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पोलिस यंत्रणेने रात्रभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. परंतु आज पुन्हा जैसे थे दिसून आले. ना पोलिस, ना सुरक्षारक्षक; केवळ जलसंपदा विभागाचे कर्मचारी धरणावर उपस्थित होते. त्यामुळे गंगापूर धरणाची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून आले. दरम्यान, याप्रकरणी गुप्तचर यंत्रणेच्या पथकानेही धरणाला भेट देऊन पाहणी केली. जलसंपदा विभागाने ग्रामीण पोलिसांकडे वारंवार कायमस्वरुप बंदोबस्ताची मागणी केली असूनही पोलिसांकडून त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविली गेली. 
 
गुरुवारी (ता.19) सायंकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास नाशिक तालुका पोलिस ठाण्यात निनावी फोनवरून गंगापूर धरण उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत धरणावर ठाण मांडून होते, तर बॉम्बशोधक-नाशक पथकाने परिसर पिंजून काढला असता हाती काहीही लागले नाही. तरीही रात्रभर बंदूकधारी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. मात्र, आज (ता. 20) पोलिसांनी धरणावरून काढता पाय घेतला. लावण्यात आलेला बंदोबस्त काढून घेण्यात आला आणि ठराविक वेळेने गस्तीपथकामार्फत गस्त वाढविण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे धमकीची गांभीर्याने दखल न घेता धरणाची सुरक्षा पुन्हा रामभरोसे सोडून देण्यात आल्याचे आजचे चित्र दिसून आले. 

धरणावर शाखाधिकाऱ्यांसह मोजकेच कर्मचारी आहेत. तेच मोजके कर्मचारी चौक्‍यांवर थांबून असतात. मात्र याठिकाणी कायमस्वरुपी 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त देण्याची वारंवार मागणी जलसंपदा विभागाकडून केला आहे. परंतु मनुष्यबळ कमतरतेचे कारण देत पोलिसांनी जलसंपदाच्या मागणीला फेटाळून लावल्याचे सांगण्यात येते. 

गुप्तचर यंत्रणेकडून पाहणी -
धरण उडवून देण्याच्या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने गंगापूर धरणाची पाहणी केली. तिघा अधिकाऱ्यांनी धरणातून होणाऱ्या विसर्गाची माहिती घेत, शाखाधिकारी रमेश वाघ यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती जाणून घेतली. 

टवाळखोरांचा हैदोस -
धरणावर रोज महाविद्यालयीन प्रेमीयुगुल येत असतात. गिरणारे रस्त्याने आलेल्यांना रोखता येते परंतु, विद्यापीठाच्या मागील बाजुने येणाऱ्यांना रोखता येत नाही. या टवाळखोरांना जलसंपदाच्या कर्मचाऱ्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु बऱ्याचदा टवाळखोर कर्मचाऱ्यांनाच दमदाटी करीत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरुप पोलिस बंदोबस्ताची गरज असल्याचे शाखाधिकारी रमेश वाघ यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Gangapur dam has not been properly protected even after threat