गंगापूर, पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्रे प्रलंबित

विक्रांत मते
सोमवार, 8 जुलै 2019

शहरातील मलनिस्सारण व्यवस्थेची स्थिती

  • तपोवन, चेहेडी, पंचक, आगरटाकळी केंद्रे कार्यान्वित
  • एकूण ३४२ एमएलडी मलजलावर प्रक्रिया
  • एकूण एक हजार ५९५ किलोमीटर मलवाहिकांचे जाळे
  • एक लाख १३ हजार चेंबर
  • २१० किलोमीटर मलवाहिकांचे नियोजन
  • गंगापूर व पिंपळगाव खांब केंद्रांचे काम प्रगतिपथावर

नाशिक - शहराचा विस्तार वाढत असताना मलजलाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत चार मलनिस्सारण केंद्रे कार्यान्वित असली तरी वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अद्याप दोन केंद्रे प्रलंबित आहेत. सद्यःस्थितीत ३४२ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया केली जाते. गंगापूर व पिंपळगाव खांब येथील केंद्रे कार्यान्वित झाल्यास क्षमता ३९२ दशलक्ष लिटरपर्यंत ती वाढणार आहे.

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत वाढत्या शहरांचा विचार करून पायाभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नाशिक महानगराचे २०४१ पर्यंतचे नियोजन करण्यात आले होते. शहरात आठ सिवरेज झोनचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील चार सिव्हरेज झोनमध्ये तपोवन, चेहेडी, पंचक, आगरटाकळी मलनिस्सारण केंद्रे कार्यान्वित आहेत. अठरा एमएलडीचे गंगापूर व ३२ एमएलडीचे पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्रे प्रस्तावित आहेत. सध्या कार्यान्वित असलेल्या चार मलनिस्सारण केंद्रांतून ३४२ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. गंगापूर व पिंपळगाव खांब केंद्रे सुरू झाल्यास ३९२.५० पर्यंत केंद्राची क्षमता वाढणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मापदंडानुसार अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्रांमध्ये आवश्‍यक त्या सुधारणा, नवीन केंद्राची निर्मिती, मलवाहिकांचे जाळे टाकण्यासाठी अमृत योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. 

गंगापूर येथे केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. पिंपळगाव खांब येथे केंद्राला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी पाच हेक्‍टर जागेची गरज आहे. १.३५ हेक्‍टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित ३.६५ हेक्‍टर जागेबाबत वाद निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangapur Pimpalgav Khamb Stool Removal Centers