गाव बनले 'व्हिलेज' : दसक-पंचक-टाकळी

गाव बनले 'व्हिलेज' : दसक-पंचक-टाकळी

आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला दसक-पंचक-टाकळीचा परिसर. आढाव, बोराडे, मोरे, बर्डे, बेंडकोळी, साळवे, पगारे, आवटे कुटुंबीयांची वस्ती असलेला, तसेच प्रेस व एचएएल कर्मचाऱ्यांची वसाहत असलेले हे शिवार गोदावरीच्या प्रदूषणाने त्रस्त बनलेय. पंचकला सिमला मिरचीसाठी तरुण शेतकऱ्यांचा शेतीमाल प्रक्रिया उद्योगासाठी प्रयत्न चाललाय. त्याच वेळी दसककर गोदावरीच्या नैसर्गिक डोहाचा विकास करून जल पर्यटनाच्या माध्यमातून, तर टाकळीवासीय आध्यात्मिक पर्यटनाच्या अनुषंगाने रोजगार निर्मितीच्या प्रतीक्षेत आहेत. श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेले पहिले गोमय हनुमान अन्‌ समर्थांच्या पहिल्या मठामुळे भक्तांसह स्थानिकांच्या स्वच्छताविषयक अपेक्षा आहेत. विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे स्थान असलेल्या या शिवाराविषयी...

पंचवटीत असताना प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजांचा पंचक्रिया विधी पंचकमध्ये, तर दशक्रिया विधी दसकमध्ये केल्याची आख्यायिका आहे. आगारटाकळीत समर्थांचे पहिले मठाधिपती उद्धवस्वामी दसकचे असल्याचे अभिमानाने स्थानिक सांगतात. त्याच वेळी सज्जनगडावर दसकचा उल्लेख आढळत असल्याचा दाखला दिला जातो. आढावनगर, नारायणबापू चौक, आढाव मळा, प्रकाश आनंदनगर, करंजकरनगर, वैशालीनगर, मंगलमूर्तीनगर, लोखंडे मळा, पारिजातनगर, एमएसईबी कॉलनी, नवरंग कॉलनी, कोयना कॉलनी, सावरकरनगर, ओमनगर परिसर, गोसावी मळा, सद्‌गुरूनगर, ज्ञानेश्‍वरनगर, नरहरीनगर, सुवर्णहरीनगर, संभाजीनगर, गुरुदत्तनगर, राजराजेश्‍वरी परिसर, मराठानगर, गणेशनगर, शिवाजीनगर आदी भागाचा समावेश असलेल्या दसक भागामधील लोकसंख्या पन्नास हजारांच्या आसपास आहे. त्यात मूळच्या नागरिकांची संख्या साडेतीन हजारांच्या आसपास आहे. याच भागातील नगरसेवक म्हणून दिनकर आढाव यांचा परिचय शहरवासीयांना आहे.

दसककर अजूनही 25 एकरावर शेती कसतात. उघड्यावर गुलाब फुलवला जातो. भाजीपाला, आले, गव्हाचे उत्पादनही घेतले जाते. संत जनार्दन स्वामींना मानणारा भक्तगण असलेल्या शिवारातील प्रकाश आनंदनगर, वैशालीनगर, आढावनगर आदी परिसरात नव्याने बांधकामे सुरू आहेत. दसकच्या शिवारात गोदावरीमध्ये बारमाही पाणी टिकत असल्याची प्रचीती आजही मिळते. पण गटारीचे पाणी मिसळत असल्याने त्यास गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रदूषणाचा विळखा संपुष्टात आणून संत जनार्दन स्वामी पुलापर्यंत घाटाचा विस्तार व्हावा, बोटिंग क्‍लब सुरू करावा, अशी मागणी स्थानिकांची आहे.

आरक्षित जागांचा प्रश्‍न ऐरणीवर
दसक भागातील आरक्षित जागांचा प्रश्‍न स्थानिकांनी ऐरणीवर आणला आहे. सर्व्हे क्रमांक 1 मधील 32 हेक्‍टर जागा पडून आहे. त्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हायला हवा. मत्स्यालय उभारावे, अशी मागणी करणाऱ्या स्थानिकांना कायदेशीर अडचणीला सामोरे जावे लागते. खुली जागा वापरता येईल, पण त्यावर बांधकाम करता येणार नाही, अशी अट असल्याने माघारी फिरण्याखेरीज गत्यंतर नसल्याचे स्थानिक सांगतात. हे कमी काय म्हणून सुलभ शौचालयाची उभारणी केल्यावर महापालिकेकडून जागा द्यावी, अशी सूचना पुढे येते. पण जेथे जागा उपलब्ध आहे, तिथे स्थानिकांचा विरोध आहे. असा दुहेरी तिढा तयार झाला आहे. खेळाच्या जागेसाठी पूर्वी आरक्षण असलेल्या पाच एकरांपैकी आता दीड एकर जागा ताब्यात असल्याने त्यावर खासदारनिधीतून क्रीडासंकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भागातील 72 खुल्या जागांपैकी 42 ठिकाणी उद्याने झाली असली, तरीही त्यांची झालेली परवड उघड्या डोळ्यांनी पाहवत नसल्याची तक्रार आहे.

वामनदादांचे स्मारक अर्धवट
लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक उभारले आहे, पण याठिकाणी डोम, कंपाउंडचा अपवाद वगळता अपेक्षित बाबी न झाल्याने टवाळखोरांचा अड्डा झाला आहे. त्यामुळे स्मारकाला वैभव मिळावे, असा आग्रह आहे. पंचक गावठाणात अयोध्यानगर, महापालिका सोसायटी, केरू पाटील-बोराडे मळा, रेल्वेलाइन, भैरवनाथनगर, प्रगतीनगर, बालाजीनगर, मोरे मळा, पिंपळपट्टी मळा या परिसराचा समावेश आहे. 30 हजार लोकसंख्या असलेल्या शिवारात बोराडेंचे पावणेदोनशे उंबरे, अनुसूचित जातीची बारा आणि अनुसूचित जमातीची सात कुटुंबे इतके स्थानिक आहेत. रंजनाताई बोराडे या उपमहापौरपदापर्यंत पोचल्याचा अभिमान स्थानिकांमध्ये आहे. नेहरूनगर आणि गोरेवाडी वसाहतीमधील जवळपास 70 टक्के रहिवासी शिवारात राहावयास आले आहेत. एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या सेवेत असलेले 85 टक्के जण स्थायिक झाले आहेत. या शिवारात 2000 पर्यंत द्राक्षाचे मळे बहरलेले होते. आता 90 टक्के क्षेत्र रहिवासी झाले असून, शेती 10 टक्के उरली आहे. त्यावर गहू, सोयाबीन, मका, शेडनेटमध्ये सिमला मिरची, टोमॅटो, भोपळा, कारल्याचे उत्पादन घेतात. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत ठिबक सिंचन, रोटेव्हेटर, पेरणीयंत्राचा वापर करण्यास सुरवात केली. या शिवाराचे लघुउद्योगाच्या दृष्टीने 1962 मध्ये महत्त्व अधोरेखित झाले होते. सायट्रिक ऍसिड बनवणारी सायट्रिक इंडिया कंपनी उभारली होती. त्या माध्यमातून सव्वाशे जणांना रोजगार मिळाला होता. ही कंपनी 1985 मध्ये बंद पडली. 1970 मध्ये विंध्या पेपर (सोमाणी पेपर) ही कंपनी सुरू झाली. त्यात अडीचशे जण कामाला होते. ही कंपनी 2008 मध्ये बंद पडली. मात्र, या दोन कंपन्यांमुळे शेतीवरील उपजीविकेचा भार कमी होण्यास मदत झाली होती. दसक-पंचक विकास सोसायटी या भागासाठी कार्यरत असली, तरीही जिल्हा बॅंकेच्या आर्थिक अडचणींमुळे सोसायटीचे महत्त्व आता नावापुरते उरले आहे.

स्थानिकांच्या अपेक्षा
दसक :
- चौकांमध्ये ज्येष्ठांची वर्दळ असते. त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची उभारणी व्हावी.
- भागातील टवाळखोरांचा बंदोबस्त करत खुल्या जागांचा उपयोग अवैध धंद्यासाठी होऊ नये, याची दक्षता घ्यावी.
- गोदावरीचा एक भाग पंचवटी आणि दुसरा किनारा नाशिक रोडकडे येत असल्याने प्रदूषणाचा प्रश्‍न सुटावा.
- 27 कर्मचाऱ्यांत असलेल्या सात पर्यवेक्षकांचा विचार करता स्वच्छतेचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी मनुष्यबळाची व्यवस्था व्हावी.

पंचक
- नागरी सुविधांसाठी टाकलेल्या आरक्षणावर महापालिकेने विकास करावा, अथवा जागांचा विकास करण्यासंबंधीचा तिढा सोडवावा.
- रेल्वेलाइन भागातील म्हाडाच्या प्रकल्पासाठी ग्राहक शोधून सदनिकांचा वापर होईल यास प्राधान्यक्रम मिळावा.
- एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य व्हावे.
- आनंदेश्‍वर व्यायामशाळेच्या माध्यमातून जोपासलेल्या कबड्डीच्या प्रोत्साहनासाठी योजना कायमस्वरूपी आखावी.

टाकळी
- आध्यात्मिक पर्यटनस्थळाच्या नकाशावर भाग ठळकपणे कोरला जावा यासाठी योजना वेगाने राबवाव्यात.
- सार्वजनिक स्वच्छतेसह कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न निकाली काढावा.
- गोदावरीत मिसळणाऱ्या गटारींचे पाणी तातडीने बंद करत दुर्गंधीच्या प्रश्‍नावर मात करावी.

सायखेडा रस्त्यावर पूर्वी भाजीबाजार भरायचा. तो आता पंचकमधील शनिमंदिराजवळील खुल्या जागेत भरतो. शेतकऱ्यांना अजूनही रस्त्यावर बसून भाजी विकावी लागते. भाजीबाजाराचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी आंदोलने झाली. पण हा प्रश्‍न अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे हा प्रश्‍न मिटावा.
- नंदकिशोर बोराडे, माजी अध्यक्ष, दसक-पंचक विकास सोसायटी

मुलांना खेळण्यासाठी उद्याने सुस्थितीत असायला हवीत. आमच्या माहितीनुसार 14 उद्याने आहेत, पण त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र आणि महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हायला हवेत.
- हाजी अहमद सय्यद, निवृत्त प्रेस कामगार, पंचक

प्राचीन आनंदेश्‍वर मंदिराची नदीच्या बाजूची भिंत अर्ध्यावर आली आहे. त्याची डागडुजी व्हायला हवी. भाजीबाजाराची जागा कमी असल्याने भुरट्या चोरट्यांकडून होणारा त्रास थांबावा. कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या दूर व्हावी.
- रमेशचंद्र देवकिसन भय्या, किराणा दुकानदार, पंचक

सायट्रिक कंपनीच्या 13 एकर जागेत "ले-आउट' झाला. प्लॉट विकले गेले. मात्र, 2002 नंतर विकास झालेला नाही. शिवाय गोदावरीच्या प्रदूषणामुळे मच्छरदाणी लावून जेवण करावे लागावे इतका डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बिटको रुग्णालयानंतर अधिक रुग्णांची वर्दळ असलेल्या दवाखान्यातील बाह्य रुग्णसेवा अधिक काळ चालवण्यासह वैद्यकीय चाचण्यांची सोय व्हायला हवी. वृंदावनच्या धर्तीवर उद्यान विकासाचा प्रश्‍न सुटायला हवा.
- ऍड. सुनील बोराडे, माजी नगरसेवक

महापालिकेचा खेडी विकासनिधी मिळायला हवा. शिवारात कमी दाबाने येणाऱ्या पाण्याच्या समस्येचे निराकारण व्हायला हवे. मुळातच जलशुद्धीकरण केंद्राकडून पुरेसे पाणी मिळत नाही. ही माहिती मिळाल्यावर जलकुंभ पुरेसे भरत नाहीत, ही वस्तुस्थिती पुढे आली. हा प्रश्‍न सोडविण्याबरोबरच शिवारात घंटागाडी वेळेवर यायला हवी.
- मंगला आढाव, नगरसेविका

पथदीप नावाला उरले आहेत. पथदीप सुरळीत राहावेत म्हणून स्थानिकांनी तक्रार केल्यावर अधिकारी "हो' म्हणतात. कर्मचारी म्हणतात, "गाडी येऊ द्या, मग दुरुस्ती करतो.' कर्मचारी गाडीची वाट पाहत बसतात. मग एरवी काय करतात, हेच उमगत नाही.
- अंबाबाई जगताप, स्थानिक रहिवासी, दसक

दसकचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर शिवारात रस्ते, पाणी, दळवळणाच्या सुविधा आहेत. पण सुलभ शौचालयाच्या स्वच्छतेसह पाणी, वीजपुरवठा याकडे महापालिका गांभीर्याने लक्ष देत नाही. स्थानिक रहिवासी पैसे देत नसल्याने शौचालयांची व्यवस्था होत नाही. त्यामुळे महापालिकेने शौचालये ताब्यात घेऊन निगा राखणे आवश्‍यक आहे.
- अनुसया आढाव, स्थानिक रहिवासी, दसक

गोदावरीमध्ये गटारी सोडल्या आहेत. सकाळी सहा ते अकरापर्यंत शिवारात दुर्गंधी पसरते. मलनिस्सारण केंद्र पूर्णक्षमतेने चालविले जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे स्वच्छतेचा प्रश्‍न काही केल्या निकाली निघत नाही.
- कुलदीप आढाव, स्थानिक रहिवासी, दसक

मलनिस्सारण केंद्राचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण व्हायला हवे. पूर्वी शेवाळी नाला स्वच्छ होता. पण आता गटारी जोडल्या गेल्याने दुर्गंधी झाली असून, नाल्याला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले. त्यावर उपाय म्हणून संरक्षक भिंत उभारून हा नाला भूमिगत करायला हवा. माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भागाची पाहणी केली होती. हे काम अद्याप होऊ शकले नाही. याशिवाय बारमाही वाहणारी नंदिनी नदी गटारगंगा झाली आहे. त्यामुळे दुर्गंधीत भर पडली आहे. नंदिनी नदीचे पुनरुज्जीवन व्हायला हवे. गटारीचे पाणी थेट गोदावरीत सोडण्यास प्रतिबंध करायला हवा.
- राहुल दिवे, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com