एक दिवसाचा पगार देत सहकाऱ्याच्या कुटूंबियांना केली मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

येवला : विनाअनुदानित शिक्षण संस्थेत शिपाई पदाची नोकरी करणाऱ्या युवकावर अचानक काळाने झडप घातली अन पाठीमागे असलेली पत्नी व छोटीशी मुले उघड्यावर आली. आता त्यांच्या भविष्याचे काय ही चिंता सतावत असल्याने सहकारी शिक्षक व संस्थेने मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या या गरीब सहकाऱ्याला मदतीचा मोठा हात दिला आहे. संस्थेने काही योगदान देत सर्व सहकाऱयांनी देखील आपल्या एक दिवसाच्या पगाराची रक्कम देत या युवकाच्या कुटुंबीयांना तब्बल पावणे चार लाखांची मदत दिली आहे.

येवला : विनाअनुदानित शिक्षण संस्थेत शिपाई पदाची नोकरी करणाऱ्या युवकावर अचानक काळाने झडप घातली अन पाठीमागे असलेली पत्नी व छोटीशी मुले उघड्यावर आली. आता त्यांच्या भविष्याचे काय ही चिंता सतावत असल्याने सहकारी शिक्षक व संस्थेने मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या या गरीब सहकाऱ्याला मदतीचा मोठा हात दिला आहे. संस्थेने काही योगदान देत सर्व सहकाऱयांनी देखील आपल्या एक दिवसाच्या पगाराची रक्कम देत या युवकाच्या कुटुंबीयांना तब्बल पावणे चार लाखांची मदत दिली आहे.

येथील जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेच्या बाभुळगाव येथील कॅम्पसमध्ये पिंपळखुटे तिसरे येथील दीपक बोडके हा सर्वसामान्य कुटुंबातील युवक नोकरी करत होता. २०१५ पासून अगोदर तंत्रनिकेतनमध्ये व आता आयटीआय महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करताना दिपकने आपल्या मनमिळाऊ, प्रामाणिक व कष्टाळू स्वभावाने सर्वांनाच आपलेसे केले होते.

विशेष म्हणजे संस्थेत नोकरी करून तो शेतीही सांभाळायचा. त्याच्या पाठीमागे आई वडिलांसह पत्नी व दोन लहान मुले असे कुटुंब होते. पण म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे मागील आठवड्यात सायंकाळी घरी जात असताना रस्त्यातच त्याचा मोटारसायकलला अपघात होऊन निधन झाले. घरातला कर्ता पुरुषच गमावल्याने या कुटुंबावर मोठे संकटाचे आभाळ कोसळले होते. हा सगळा विचार करून मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे यांनी दीपकच्या कुटुंबियांना मदत देण्याचे जाहीर करून सर्व शिक्षक सहकाऱयांनी देखील यात वाटा उचलावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि विनाअनुदानित संस्था असल्याने शासनाकडून त्यांना एक रुपयाची मदत मिळणार नाही हा विचार करून लागलीच सर्वांनी देखील याला होकार देत आपले एक दिवसाचे वेतन त्यांच्या कुटुंबियांना दिले.

बाभुळगाव कॅम्पसमधील २५ वर महाविद्यालयांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन तसेच संस्थेने काही रक्कम टाकून ३ लाख ७५ हजाराची मदत दीपकच्या घरी जाऊन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे तसेच मातोश्री शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल दराडे यांनी त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केली आहे. दीपकची दोन्ही मुले लहान असल्याने त्यांच्या भविष्याचा विचार करून या दोघांच्या नावे प्रत्येकी १ लाख ८७ हजाराची ठेव पावती १० वर्षासाठी करण्यात येऊन ही पावती त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. ही रक्कम व त्यातून मिळणाऱ्या व्याजातून या मुलांचे शिक्षण पार पडणार असून भविष्यातही त्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. एरवी सहकारी नव्हे तर नात्यागोत्याशी देखील देणेघेणे नसलेला आपला समाज, अशा व्यवस्थेत सरकारी पगार नसताना सुद्धा सर्व शिक्षकांनी एक दिवसाचा पगार दीपकच्या कुटुंबीयांसाठी देऊन मनाच्या दिलदारपणाचे एक मोठे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे हे नक्की!

"वेळ सांगून येत नसते..अतिशय गरीब असलेल्या कर्मचाऱ्यांवर काळाने घाला घातल्याने अडचणीत आलेल्या त्याच्या कुटुंबीयांना मदत देण्याची पद्धत संस्थेने हाती घेतली आहे.यापूर्वी दोन तरुणांच्या कुटुंबीयांना अशीच मदत दिली असून आता दीपकला दिलेली मदत देखील त्याच्या कुटुंबियांना अडचणीत हातभार लावणारी ठरणार आहे." असे मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे यांनी सांगितले. 

Web Title: gather one day salary for died collegues family