स्वगृही परतताना गहिवरली ‘गीता’

स्वगृही परतताना गहिवरली ‘गीता’

धुळे - धरणगाव पोलिसांमार्फत धुळ्यातील संस्कार मतिमंद बालगृहात आलेली गतिमंद गीता किशन आज प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर झारखंडला स्वगृही रवाना झाली. तीन वर्षांपासून आई-वडिलांपासून दुरावलेली असल्याने गावी जाण्याचा अत्यानंद झाला खरा; परंतु ज्या विद्यालयात तिला आश्रय मिळाला तेथून परतताना पावले जड झाली अन्‌ अश्रूंचा बांध फुटला.

एकीकडे मुलीचे पालक शोधल्याचा आनंद, तर दुसरीकडे तिच्या मैत्रिणींची झालेली रडारड यामुळे वातावरण अधिक भावनिक झाले. मात्र महाराष्ट्र मुलींसाठी किती सुरक्षित आहे याची प्रचिती देत झारखंड पोलिस आणि गीताच्या भावानेही प्रशासनाचे आभार मानले. 

गतिमंद गीताचा प्रवास 
तीन वर्षांपूर्वी ऑपरेशन मुस्कान मोहिमेंतर्गत धरणगाव पोलिसांना गीतांजली एक्‍सप्रेसमध्ये एक गतिमंद मुलगी आढळल्याने तिचे नाव गीता ठेवले. धुळ्यातील संस्कार बालगृहात गीता प्रवेशित झाल्यानंतर तिची ओळख काढण्याचा प्रयत्न केला. अखेरीस ई-सेवा केंद्रचालक राजेन वानखेडे यांनी अंगठ्याच्या ठशांवरून तिचा पत्ता शोधून काढला. संस्थाचालक सुनील वाघ यांनी तेथील पोलिस अधीक्षकांशी वेळोवेळी संपर्क साधून तिचे पालक व पोलिसांना घेण्यास येण्याची विनंती केली. 

पोलिसांसमवेत कुटुंबीय दाखल 
आधार कार्डवरून गीताचे खरे नाव सुशीला पिंगुवा क्रिश्‍ना चंपिला असे असून ती मूळ कुमारडूंगी पश्‍चिमी सिंहभूम (झारखंड) येथील असल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी तिचा भाऊ लखिंदर क्रिश्‍ना पिंगुवा, झारखंडचे पोलिस अधिकारी मनोजकुमार सिंग, महिला पोलिस सुनीता सोरेन गीताला घेण्यासाठी दाखल झाले. मेडिकल रिपोर्ट आणि कागदोपत्री सोपस्कार पार पाडल्यानंतर गीताचा निरोप समारंभही झाला. पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांच्या उपस्थितीत तिला निरोप देण्यात आला. यावेळी संस्कार बालगृहाचे संचालक सुनील वाघ, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष ॲड. अमित दुसाने, सदस्य डॉ. सुदाम राठोड, प्रा. वैशाली पाटील, पोलिस निरीक्षक दत्ता पवार, पी. ओ. पाटील, पवार, मयूर वाघ, श्री. वानखेडे उपस्थित होते.

महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र 
रेल्वेत सापडलेली अनाथ मुलगी स्वतःचे नावही व्यवस्थित सांगू शकत नाही पण तीन वर्षांनंतर ती सुरक्षितरीत्या आढळते. यावरून महाराष्ट्रात मुली किती सुरक्षित आहेत याची प्रचिती येते, असे बोलताना गीताचा भाऊ लखिंदरचे डोळे पाणावले. संस्कार बालगृहातर्फे गीताला नवीन कपडे, चप्पलसह सर्व आवश्‍यक वस्तू देत झारखंडसाठी रवाना करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com