भिडेंच्या अटकेसाठी बागलाण तालुका भारिप बहुजन महासंघाचा घंटानाद

baglan
baglan

सटाणा : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप करीत सरकारला जागे करण्यासाठी बागलाण तालुका भारिप बहुजन महासंघातर्फे आज मंगळवारी (ता.३) रोजी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलकांनी तहसील आवारात ठिय्या देऊन शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

आज दुपारी बारा वाजता बागलाण तालुका भारिप बहुजन महासंघातर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. तहसील आवारात मोर्चा येताच कार्यकर्त्यांनी ठिय्या देत घंटानाद करून शासनविरोधात घोषणाबाजी सुरु केली. यावेळी आंदोलकांतर्फे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक न करता राज्य सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजी भिडे यांच्याविरुद्ध कोणताही पुरवाना नसल्याचे विधीमंडळात सांगून त्यांना क्‍लिनचिट देत आहेत. त्यामुळे राज्यातील मागासवर्गीय समाजात तीव्र असंतोष खदखदत आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी तसेच आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांवर दुर्लक्ष करीत असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देता त्यांची शैक्षणिक कोंडी करीत आहे. या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवर जाचक अटी लादून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडला पाने पुसली आहेत. 

सरकारच्या या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासोबतच भीमा कोरेगाव हल्ल्याचे मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी, भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणातील बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, अनुसूचित जाती - जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती तत्काळ दिली जावी, टीआयएसएस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सात - बारा कोरा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन निरभवणे, शहराध्यक्ष शेखर बच्छाव, विकास देवरे, जितेंद्र बच्छाव, अमोल बच्छाव,  संदीप वाघ, सचिन अहिरे, राजेंद्र जगताप, महेश धिवरे, निखील कासारे, स्वप्नील पवार, हर्षद बच्छाव, अंकुश बच्छाव, करण बच्छाव, भूषण म्हसदे, आकाश म्हसदे, प्रेम गरुड, सचिन शिंदे, दिलीप अहिरे, शरद पवार, चंद्रकांत वाघ, भाऊसाहेब जगताप, अक्षय म्हसदे, बंटी जगताप आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com