घरकुल गैरव्यवहारप्रकरणी सात जूनला निकाल शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना होती. मात्र, पुष्पा पाटील, सुधा काळे, अजय राम जाधव यांच्यासह अन्य दोन आरोपी गैरहजर होते. त्यामुळे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पाचही आरोपींना अजामीनपात्र वॉरंट काढावे, अशी मागणी केली. ती ग्राह्य मानून न्या. सृष्टी निळकंठ यांनी तिघांना वॉरंट काढण्याचा आदेश दिला. सुनावणीस आरोपी माजी मंत्री सुरेश जैन, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, मेजर नाना वाणी यांच्यासह एकूण 43 आरोपी हजर होते.

जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी तीन फेब्रुवारी 2006 रोजी तेथील शहर पोलिस ठाण्यात सुमारे 48 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा 93 संशयितांवर गुन्हा दाखल झाला. त्यानुसार 57 पैकी 53 आरोपींवर दोषारोप ठेवण्यात आले. यात दोन माजी मंत्र्यांसह काही माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सहा वर्षांत तब्बल 11 तपासाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. एकूण 57 पैकी आठ आरोपींचा मृत्यू झाला आहे. एका आरोपीचा वेगळा खटला वगळता 48 आरोपींना आज येथील न्यायालयात हजर ठेवण्याची सूचना होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gharkul Non Behavioral Result Court