घोटीत लाल फितीत अडकला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव

गोपाल शिंदे
मंगळवार, 27 जून 2017

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; अधिकाऱ्यावर कामाचा ताण
घोटी - नित्याने घडणारे अपघात व मुंबई-नाशिक महामार्गावर असलेले घोटी येथे उपजिल्हा रुग्णालय होणे काळाची गरज बनली आहे. शासनाने आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात दिल्या असल्या, तरी त्या मिळतात किती व कागदावर किती, हा संशोधनाचा भाग असला, तरी त्वरित आरोग्यसेवेसाठी शासकीय सेवेवरच सर्वांचा विश्‍वास आहे. यामुळे येथील लालफितीत अडकलेला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

इगतपुरी तालुक्‍यात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मुंबई-नाशिक महामार्गापासून इगतपुरीच्या शेवटच्या टप्प्यात अपघात दक्षता केंद्र (ट्रॉमाकेअर केंद्र) बांधण्यात आले आहे. अपघात झालेले रुग्ण सततची वाहतूक कोंडी व तीन किलोमीटर अंतर यामुळे घोटी ग्रामीण रुग्णालयात जाणे पसंत करतात. इगतपुरी येथील अपघात दक्षता केंद्राचा कुठलाही फायदा रुग्णांना मिळत नाही. याचा सर्व भार घोटी रुग्णालयावर येत आहे.

एकच वैद्यकीय अधिकारी असून, त्यांना नित्याला तीनशेहून अधिक रुग्णांची करावी लागणारी तपासणी, स्त्रीरोगतज्ज्ञ एका वर्षापासून रजेवर, बालरोग, अस्थिरोगतज्ज्ञ व अपुरी कर्मचारी संख्या, अशी अवस्था घोटी ग्रामीण रुग्णालयाची आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या प्रस्तावावर पाठपुरावा करणे, नगर परिषदेच्या उंबरठ्यावर असलेल्या व पुढील पिढीच्या उत्कर्षासाठी घोटीला जिल्हा उपकेंद्राची गरज विस्तारणाऱ्या लोकसंख्येला भासू लागली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सेवेचा कार्यकाळ हा अधिकचा होऊनदेखील बदलीची कुठलीही कार्यवाही होत नसल्याने त्यांच्या बदलीच्या प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.

तालुक्‍यासह महामार्गावरील अपघात, सर्पदंश, प्रसूती, नवजात बालके, कुपोषणाची साथ, अपुरी कर्मचारी संख्या, वेळेवर रजा न मिळणे, प्राथमिक केंद्रावर सुविधांची असलेली कमतरता, अशा विविध कारणांमुळे रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहताहेत. हीच कारणे प्रथमदर्शनी डॉक्‍टर व रुग्ण यांच्यातील वादाला कारणीभूत ठरत आहेत. आदिवासी तालुका असूनही आरोग्याच्या बाबतीतही दुर्लक्षित कसा, असा प्रश्‍न बाहेरगावांवरून येणारे रुग्ण, त्यांचे आप्तस्वकीयांसह स्थानिक उपस्थित करू लागले आहेत. लालफितीच्या कारभारात येथील उपजिल्हा रुग्णालयाचा अडकलेला प्रस्ताव पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याचकडे आरोग्य खाते असल्याचे त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी घोटीच्या ग्रामस्थांकडून होत आहे. 

इगतपुरी हा आदिवासी तालुका असून, आरोग्याच्या दृष्टीने प्रबळ सेवा देण्यास शासकीय रुग्णालय कमी पडत आहेत. शासन निकषाप्रमाणे नगर परिषदेकडे वाटचाल करणाऱ्या घोटीलगत असलेली खेडी, महामार्गावरील नित्याचे अपघात, दररोज रुग्णांची वाढती संख्या यामुळे लवकरच उपजिल्हा रुग्णालय होणे गरज बनली आहे. 
- संदीप किर्वे, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

Web Title: ghoti nashik news subdistrict hospital proposal in red ribbon