मुलींच्या जन्मदरात जिल्ह्यात पेठ तालुका अव्वल

मुलींच्या जन्मदरात जिल्ह्यात पेठ तालुका अव्वल

‘लेक वाचवा’बाबत आदिवासी बांधवांची पुढारलेली विचारसरणी ठरतेय प्रेरणादायी

इगतपुरी - पुरोगामी महाराष्ट्रात ‘बेटी बचाओ’ची झूल पांघरून, गर्भलिंग चाचण्या करून, मुलींच्या निष्पाप जिवाला संपवणाऱ्या पुढारलेल्या प्रदेशापेक्षा पेठसारख्या आदिवासीबहुल तालुक्‍यातील आदिवासी बांधवांनी सणसणीत चपराक दिली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या मुलींच्या जन्मदर आकडेवारीत पेठ तालुक्‍यात हजारी १०३२ मुलींना जन्म देऊन अव्वल स्थान पटकावले आहे. येवला (९७०) तालुक्‍याने दुसऱ्या, तर देवळा (९४६) तिसऱ्या स्थानावर आहे.

मुलींचा जन्मदर वाढण्याच्या दृष्टीने जनजागृतीही केली जाते. मात्र, समाजात आजही आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून गर्भात मुलींची हत्या करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दलाल कार्यान्वित असल्याचेही गत अनेक दिवसांपासून दिसून आले आहे.
दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासी कुटुंबात मुलीच्या जन्माचे आनंदाने स्वागत करण्यात येते, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. आदिवासी अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असला, तरी सुसंस्कृत असल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारच्या तपासण्या, गर्भलिंग चाचण्या, वैद्यकीय सुविधांचा वापर न करता नैसर्गिकरीत्या बाळंतपणाचे प्रमाणही या तालुक्‍यात अधिक दिसते.

पटसंख्येतही मुलीच अव्वल
पेठ तालुक्‍यातील जिल्हा परिषद, खासगी व शासकीय आश्रमशाळांमधील पटसंख्येतही मुलीच अव्वल असल्याचे दिसते. शाळांमध्ये मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त दिसते. त्यामुळे आदिवासी मुली सर्वच क्षेत्रांत अव्वल असल्याचे ताजे उदाहरण ‘सावरपाडा एक्‍स्प्रेस’ कविता राऊत हिच्या खेळातील आंतरराष्ट्रीय कामगिरीवरून दिसते.

जिल्ह्यातील तालुकानिहाय मुलींचा जन्मदर असा -
पेठ- एक हजार ३२, येवला- ९७०, देवळा- ९४६,
कळवण- ९३२, बागलाण- ९२९, नांदगाव- ९२५,
निफाड- ९२३, सुरगाणा- ९२०, नाशिक- ९२०,
दिंडोरी- ९११, मालेगाव- ८९९, त्र्यंबकेश्‍वर- ८८७,
इगतपुरी- ८७८, चांदवड- ८५८, सिन्नर-८४४.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com