नाशिक जिल्ह्यात वाढला मुलींचा जन्मदर

रवींद्र पगार
शुक्रवार, 5 जुलै 2019

धडक तपासणीमुळे धास्ती
जिल्ह्यात प्रसूतिपूर्व प्रसूती धारणा कायदा नियंत्रण सल्लागार समितीतर्फे (पीसीपीएनडीटी) तपासणी होऊ लागल्याने डॉक्‍टरांमध्ये धास्ती निर्माण होऊन गर्भलिंग निदानास आळा बसण्यास मदत होत आहे. त्यामुळे निदान न झाल्याने गर्भपातासही आळा बसून मुलीही आनंदाने हे जग पाहू लागल्या आहेत.

कळवण - स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठीची जनजागृती, सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग आणि डॉक्‍टरांवर होणारी कारवाई, अशा विविध कारणांमुळे नाशिक जिल्ह्यात मुलींचा जन्मदर दर वर्षी वाढतच असून, नकोशी आता हवीहवीशी होत असल्याचे सुखद चित्र नाशिक जिल्ह्यात दिसत आहे.

गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला असता, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढतच गेल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून लक्षात येत आहे. मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे सुखद चित्र जिल्ह्यात दिसत आहे. २०१६ मध्ये प्रतिहजारी मुलांच्या तुलनेत ९४० मुली होत्या. ही संख्या आज ९६९ वर पोचली आहे. २०१६ नंतर एकाच वर्षात ३० ने ही संख्या वाढून २०१७ मध्ये प्रतिहजारी ९७० मुली जन्माला आल्या. त्यानंतर २०१८ मध्ये ९६९ मुली जन्माला आल्या. सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’अंतर्गत मुलींचे स्वावलंबन, पोषणाबाबतची जनजागृती यामुळेही मुलींच्या जन्मदर वाढीस चालना मिळत आहे.

जिल्ह्यात वाढती जनजागृती व कारवाईच्या धास्तीने पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होण्यास आळा बसत आहे. यामुळे मुलींचा जन्मदर वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत होणाऱ्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येत असल्याने अधिकाऱ्यांकडून कारवाईचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जनजागृती होऊन प्रभावी अंमलबजावणी होऊन मुलींचा जन्मदर वाढत आहे.
- डॉ. अनंत पवार, बाह्य संपर्क अधिकारी, जिल्हा रुग्णालय, नाशिक 

आजच्या युगात मुली या प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या पुढे असल्याचे चित्र आहे. मुली आपले कर्तृत्व सिद्ध करत असल्याने समाजाने मुलगा-मुलगी हा भेद न करता मुलींना हे जग पाहू द्यावे. मला दोन मुली असून, त्यांना मुलांप्रमाणेच प्रेम देत आहे.
- दीपाली महाजन, गृहिणी, कळवण 

शासन व सामाजिक संस्थांनी अनेक वर्षांपासून केलेल्या जनजागृतीमुळे हे शक्य झाले. कळवणसारख्या आदिवासी भागात मुलींच्या जन्माचा टक्का चांगला असून, हजारामागे १००८ मुली हा जन्मदर निश्चितच आशादायी आहे.
- मीनाक्षी मालपुरे, माजी अध्यक्षा, इनरव्हील क्लब, कळवण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Birthrate Increase in Nashik District