पैशासाठी एकाच मुलीचा चक्क चौघांशी विवाह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

एका नवरीने एक नव्हे, दोन नव्हे चार जणांना रेशीमगाठीत अडकवून चांगलेच फसविले असून, एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना उघडकीस आल्याने फसविलेल्या नवरोबांची झोपच उडाली आहे.

मनमाड -  एका नवरीने एक नव्हे, दोन नव्हे चार जणांना रेशीमगाठीत अडकवून चांगलेच फसविले असून, एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना उघडकीस आल्याने फसविलेल्या नवरोबांची झोपच उडाली आहे. पैशासाठी नावे बदलून गुपचूप लग्न लावून सर्वांचीच फसवणूक करत असल्याचा प्रकार लक्षात आल्यावर चौथ्या वराने "सावधान' होत पैशांसाठी लग्न लावून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या हाती बेड्या ठोकल्या. 

मनमाड येथील संभाजीनगरमधील रहिवासी अशोक जगन्नाथ डोंगरे यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. यातच त्यांची ओळख पूजा भागवत गुळे या लातूर जिल्ह्यातील महिलेशी झाली. माझ्या बघण्यात एक मुलगी आहे; परंतु तुम्हाला त्यांना काही पैसे द्यावे लागतील. ते गरीब आहेत, असे सांगून तिने लातूरच्या अहमदपूर गावातील एका मुलीशी विवाह लावून दिला. यात 40 हजार रुपये रोख व 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 90 हजार रुपये खर्च दिला. लग्नाच्या 14 दिवसांनंतर मुलगी माहेरी गेली. काही दिवसांनी अशोक डोंगरे त्यांच्या मुलाला घेऊन ज्योतीला आणण्यासाठी गेले. त्या वेळी सागर पालवे या तरुणाशी तिचा विवाह होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी मनमाड शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली व बंडू नामदेव केंद्रे, त्याची पत्नी विमल बंडू केंद्रे, मध्यस्थी पूजा भागवत गुळे व विठ्ठल पांडुरंग मुंडे आणि नववधू यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या सर्व घटनेची माहिती घेत प्रभारी पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सर्वांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला व तपासाची चक्रे फिरविली. यात हा सर्व प्रकार मिटविण्यासाठी केंद्रे आणि मध्यस्थ मनमाड येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून या टोळीला शिताफीने अटक केली. या चार जणांव्यतिरिक्त अजून किती जणांना फसविले आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl marriage for money

टॅग्स