मुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण

मुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण

जळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. काही तरुणांनी या कुटुंबावर हल्ला चढवत तरुणीच्या आईचे कपडे फाडून मारहाण केली. दरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलिसांत तक्रार घेऊन गेलेल्या पीडित कुटुंबासच पोलिसांनी धमकावल्याने आता या तरुणीसह तिच्या आईने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

शहापूर (ता.जामनेर) येथील बावीस वर्षीय तरुणी धारिवाल महाविद्यालय, जामनेर येथे बीसीएचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात जाण्या-येण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर शेरेबाजी करून छेड काढण्यात येत होती. ही तरुणी घराबाहेर निघताच ‘तू कलेक्‍टर व्हशीन का, फौजदार व्हयं..’ अशा शेरेबाजीने सुरू झालेला त्रास अनावर झाला. त्यामुळे या तरुणीसह तिच्या आईने विरोध केला म्हणून ७ जानेवारीला पीडितेच्या कुटुंबाकडून धार्मिक कार्यक्रमाची मिरवणूक सुरू असतानाच गावातील प्रदीप पाटील, सुरेश डोंगरे, रमेश राजपूत, कल्पनाबाई, शुभांगी, गोलू, पूजाबाई, एकनाथ राजपूत, सतीश डोंगरे, दौलत राजपूत, रवींद्र तेली, संदीप राजपूत, योगेश डोंगरे यांनी हल्ला चढवत मारहाण केली. मारहाणीत पीडितेच्या आईच्या केसांची ओढाताण करून अंगावरचे कपडे फाडून विवस्त्र करून मारहाण केल्याचे जखमींनी माहिती देताना सांगितले. 

पोलिसांकडून दखल नाही
घडल्या प्रकाराची तक्रार पोलिसांत देण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी पिटाळून लावल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊनही घडल्या प्रकारावर कारवाई होत नसल्याने या कुटुंबीयांनी जिल्हा महिला असोसिएशनला संपर्क केल्यावर आज सदस्या राजकुमारी बाल्दी, अंजली पाटील, वैशाली पाटील  यांच्यासह इतर सदस्यांनी भेट घेत माहिती घेतली. 

जिल्हा रुग्णालयात दाखल 
या घटनेत जखमी, कोकिळा आत्माराम राजपूत (वय ६८), छाया राजपूत (वय ३४), इंदूबाई राजपूत (वय ६०), मंजुळा राजपूत (वय ७०), सुवर्णा राजपूत (वय २२) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com