धुळ्याच्या बालगृहातील मुली गिरवताहेत स्वावलंबनाचा पाठ! 

dhule
dhule

धुळे : निराधार, निराश्रित, अनाथ असलेल्या बालगृहातील मुलींमध्ये आपणही स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वावलंबी व्हावे, अशी उमेद निर्माण झाली. ही अपेक्षा त्यांनी बालकल्याण समितीकडे व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बहुमोल सहकार्याने आणि दानशूरांनी मदतीचा हात पुढे केल्याने ही अपेक्षापूर्ती झाली. लगोलग त्या मुलींना येथे संगणकीय प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. "त्या' मुलीही आपल्या पाठीशी कुणी तरी खंबीरपणे उभे आहेत या विचाराने भारावल्या...! 

येथील एका बालगृहाला धुळे बालकल्याण समितीने भेट दिली. त्यावेळी दहावीच्या मुलींना सुट्टीमध्ये काय करण्याची इच्छा आहे, अशी विचारणा केली. तेव्हा संगणकीय प्रशिक्षणाची संकल्पना समितीच्या सदस्या प्रा. वैशाली पाटील यांनी मांडली. नंतर समितीचे अध्यक्ष ऍड. अमित दुसाने, डॉ. सुदाम राठोड, प्रा. सौ. पाटील, श्री. भोसले यांच्यात सल्लामसलत झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संयुक्त चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्नांती संबंधित मुलींना मोफत संगणकीय प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्या आव्हानाला दानशूरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उदात्त कार्य उभे राहिले. 

दानशूरांचे पाठबळ 
बालगृहातील चौदा मुलींना मोफत संगणकीय प्रशिक्षण देण्यासाठी बोस्टन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक विष्णुकांत फाफट यांनी सकारात्मक भूमिका घेतली. लायन्स क्‍लबचे पदाधिकारी नितीन बंग, चेतन बरडिया, अविनाश लोखंडे, तसेच डॉ. आनंद जोशी, सीए पवन अग्रवाल, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत केले, रोटरी क्‍लब ऑफ धुळे क्रॉस रोडचे अध्यक्ष नीलेश गोटी आणि रोटरी क्‍लबचे माजी गव्हर्नर आशिष अजमेरा या दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. त्यातून राज्यातील या अनोख्या उपक्रमाला चालना मिळाली. "बोस्टन'मध्ये केंद्र सरकारच्या दोन महिन्यांच्या "सीसीसी' अभ्यासक्रमासाठी या मुलींचा प्रवेश नोंदविला गेला आहे. बालकल्याण समितीसह दानशूरांच्या बांधिलकीच्या कार्याची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशंसा केली. जिल्हाधिकारी रेखावार यांनी श्री. फाफट, अन्य दानशूर व्यक्ती, तसेच बालकल्याण समिती सदस्यांचा सत्कार केला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा परिविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, सतीश चव्हाण, जगदीश जिरे यांनी सहयोग दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com