प्यायला तरी पाणी द्याहो!

प्यायला तरी पाणी द्याहो!

देऊर - धुळे तालुक्‍यात सातत्याने उद्‌भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे पांझरा नदीकाठच्या गावांतही पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. तालुक्‍यातील विविध गावांतील ग्रामस्थ दीड-दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत आहेत. प्रशासनाकडून मात्र काहीच उपाययोजना होत नसल्याने किमान पिण्यासाठी तरी अक्कलपाडा प्रकल्पातून नदीकाठच्या गावांसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी धुळे तालुक्‍यातील नेर, देऊर, अकलाड- मोराणे, आनंदखेडे आदी गावांतील ग्रामस्थांकडून होत आहे.

धुळे तालुक्‍यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने गावोगावच्या विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. काही गावांत प्रशासनाने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असला, तरी अन्य गावे मात्र पाण्यापासून वंचित आहेत. यामुळे ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. विशेषतः पांझरा नदीकाठच्या गावांतील स्थितीही गंभीर बनली आहे. यातील बहुतांश गावांच्या पाणी योजनेच्या विहिरी पांझरा नदीकाठी आहेत. मात्र, पुरेशा पावसाअभावी डिसेंबरपासूनच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिथे माणसांना प्यायला पाणी नाही तिथे जनावरांची अवस्थाही अतिशय गंभीर झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पांझरा नदीकाठच्या गावांचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत आज नेरचे सरपंच शंकरराव खलाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय माळी, अकलाडच्या सरपंच कल्पना माळी, देऊर बुद्रुकचे सरपंच प्रतिनिधी दिगंबर देवरे, आनंदखेडेचे सरपंच प्रतिनिधी देवेंद्र पाटील, देऊर खुर्दचे सरपंच प्रतिनिधी भटू साळवे, मोराणेचे अनिल पाटील, देऊरचे सामाजिक कार्यकर्ते जगदीश देवरे, नेरचे संतोष खलाणे, नामदेव माळी, संतोष ईशी आदींनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देत पाणीटंचाईबाबत व्यथा मांडली. यावर जिल्हाधिकारी रेखावार यांनी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवर्तन सोडण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 

नेरची स्थिती गंभीर
नेरची लोकसंख्या सुमारे २५ हजारांवर असून, गावातील पाणीपुरवठ्याच्या दोन्ही विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या एकाच विहिरीवरून दर आठ दिवसांनी गावातील एका गल्लीत पाणीपुरवठा करावा लागत आहे. आनंदखेडे येथेही सध्या तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या धुळे शहरासाठी नकाणे तलावात अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले जात आहे. यामुळे पांझरा नदीकाठच्या गावांचाही विचार व्हावा, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com