काळा पैसा नष्ट करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले नाही - प्रा. मुरुगकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली. त्यातून काळा पैसा बाहेर येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. नोटाबंदीमुळे प्राप्तिकर भरणारे वाढतील, बनावट नोटांचे प्रमाण कमी होईल, डिजिटायझेशनचे फायदे होतील हे जरी खरे असले, तरी काळा पैसा रोखणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. काळा पैसा नष्ट करणे हे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही, असे प्रतिपादन प्रा. मिलिंद मुरुगकर यांनी केले.
यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत (कै.) रामनाथशेठ चांडक स्मृती व्याख्यानात ते "नोटाबंदीचा फायदा राजकीय की आर्थिक' या विषयावर बोलत होते. या वेळी पेठे विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक व्ही. टी. जाधव, श्रीकांत बेणी, संगीता बाफणा, अरुण शेंदुर्णीकर उपस्थित होते.

प्रा. मुरुगकर म्हणाले, की सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली. या घोषणेतच नाट्यमयता होती. जगाच्या इतिहासात असा अचानक निर्णय जाहीर होण्याची घटना पहिल्यांदाच घडली होती. याअगोदरही काही देशांनी नोटाबंदी केली होती. पण त्या वेळी एवढा धक्का बसला नाही. काहीतरी क्रांतिकारी घटना आहे, असे सर्वांना वाटत होते. आश्‍चर्य आणि आनंद यांचे मिश्रण सर्वत्र दिसत होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यात फरक पडत गेला. उन्हात उभे राहणे, लोकांच्या रांगा अशा एक-एक प्रतिक्रिया नंतर येऊ लागल्या.
भ्रष्टाचाराचे स्वरूप 1990 पासून बदलले. तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला तेव्हापासून देशाच्या अर्थव्यवस्थेत मूलगामी स्वरूपाचा बदल झाला. 1990 ते आजपर्यंत देशाचा संपत्ती निर्माण करण्याचा दर झपाट्याने वाढला. 1990 नंतर सरकारकडे महसूल वाढू लागला. सरकारला पायाभूत सुविधा, शिक्षण, अन्नसुरक्षा यामध्ये गुंतवणूक करता आली. पायाभूत सुविधांमुळे ठेकेदार आणि राजकारणी अशी लॉबी तयार झाली. समृद्धी वाढली, आकांक्षा वाढली पण भ्रष्टाचार वाढत गेला. विषमता वाढत गेली. अण्णा हजारेंना आंदोलन करावे लागले. मोदींनी काळ्या पैशाचे आश्‍वासन दिले. त्यांना लोकांनी प्रतिसाद देत निवडून दिले.

नोटाबंदीमुळे लोकांचे नुकसान होत होते पण तरी सुरवातीला त्यांना आनंद वाटत होता. उद्या चांगला दिवस येईल, असा आशावाद त्यांच्यात होता. काळ्या पैशाची निर्मिती नष्ट झाली पाहिजे. काळा पैसा नष्ट झाला का? तो निर्मितीचा वेग कमी झाला का? हे सर्व प्रश्‍न अनुत्तरितच आहेत. अशा अनेक मुद्द्यांचा प्रा. मुरुगकर यांनी वस्तुनिष्ठ ऊहापोह केला.

आजचे व्याख्यान
वक्ते - दामोदर मानकर
विषय - संतांची संगती हेच जीवन
वेळ - सायं. 7

Web Title: The goal of destroying black money has not been achieved